केंद्राकडून प्रदूषणकर्त्याविरुद्ध कारवाईचे निर्देश, तरीही जलप्रदूषण सुरूच

Center directs action against polluters yet water pollution continues
Center directs action against polluters yet water pollution continues

पणजी : वेळ सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारासची. मांडवी पुलावर दुचाकी एका हाताने चालवत दुसऱ्या हाताने घराकडून आणलेली कचऱ्याची पिशवी नदीत भिरकावणारा दुचाकीस्वार. हे चित्र आता नेहमीचेच झाले आहे. नदी, ओहोळात गाड्या धुण्यापासून थेट मलजल नदीच्या पात्रात सोडण्याचे प्रकार राज्यात घडत आहेत.
मध्यंतरी आरोग्य खात्याने नदीच्या पात्रात मलजल सोडणाऱ्या घरांची पाणी वीजजोड तोडावा यासाठी कारवाई सुरू केली होती. त्या मोहिमेत अनेक घरांतील शौचालयांना शोषखड्डे बांधण्यात आले. तरीही हे प्रमाण अत्यल्प आहे. जलप्रदूषण दिवसाढवळ्या राज्यात सुरूच आहे. आता केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रदूषणकर्त्याला तत्काळ पकडण्याचे आदेश जारी केले तरी त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.


सरकार आपल्या परीने सांडपाणी प्रक्रिया आणि मलनिःस्सारण प्रकल्पांची संख्या आणि क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नदीचे पात्र म्हणजे हक्काची कचराकुंडी असे मानणाऱ्यांची मानसिकता बदलली जात नाही, तोवर राज्यातील जलप्रदूषण कमी होण्याची शक्यता धुसर दिसत आहे.


शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जलप्रदूषणाने उग्र रूप धारण केले असून, त्यासाठी सर्वस्वी त्या त्या ठिकाणचे नागरिकच जबाबदार असल्याचे निदर्शनास येते. जलप्रदूषण रोखणे ही स्थानिक प्रशासन व मानवी समाजाची सामूहिक जबाबदारी आहे; परंतु याकडे कोणीही फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याचा परिणाम नकळतपणे मानवी आरोग्यावर होत आहे. ग्रामीण भागात ओढे-नाले, नदी या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील पाणी, गावातील गटारातील पाणी सोडल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या समस्येकडे ना शासनाचे लक्ष आहे ना नागरिकांचे.

मानसिकता बदलावी लागेल?
नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य वापर करणे, हे त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सामाजिक कर्तव्य असते. गावातील गटार योजना व उद्योगातील सांडपाणी परिसरातील ओढे-नाले व नदीच्या पात्रात न सोडता अशा पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. परंतु असे न करता सांडपाणी सरळ नदीपात्रात सोडून दिले जाते, त्यामुळे नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. घाणपाण्याबरोबरच अनेक त्याज्य व घनपदार्थ नदीच्या पात्रात सोडून दिले जातात. स्थानिक प्रशासनाबरोबरच ग्रामस्थांनीही आपल्या सांडपाण्याची व कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, त्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे प्रत्येक नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नेमून दिलेल्या पेटीतच कचरा टाकणे आवश्‍यक आहे. ‘आपल्याला काय करायचे?’ ही भूमिका नागरिकांनी सोडणे गरजेचे आहे. कचरा व घाण पाणी नदीच्या पात्रात न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जलप्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनीही विशेष जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 

आरोग्‍यावर परिणाम
जलप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, त्यामुळे मानवाला विविध साथीच्या रोगांना बळी पडावे लागते. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अंगाला खाज सुटणे, सर्दी, खोकला, कावीळ, डोकेदुखी, जुलाब आदी आजार होतात.  साथीच्या रोगाचा प्रसार होतो. प्रदूषित ठिकाणी डास, विविध जीवजंतू साठून चिकुनगुनियासारखे लवकर बरे न होणारे आजारही मानवाला होतात. परिणामी माणसांचे जीवन अस्थिर होते. त्यासाठी जलप्रदूषण रोखणे काळाची गरज असून, शासनाने विशेष मोहीम राबविणे आवश्‍यक आहे. शासनाच्या कृतीला नागरिकांनी विशेष साथ देणे गरजेचे वाटते!


जलप्रदूषणात वाढ होत असल्याचे लक्षात येताच बहुतांश कुटुंबांत पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वॉटर फिल्टर वापरण्यास सुरवात झाली आहे, त्यामुळे बाजारात वॉटर फिल्टरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com