म्हादईप्रश्नी केंद्राकडून गोव्याला महत्त्व नाही

विलास महाडिक
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

गोवा फरवर्डतर्फे निषेध, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे

पणजी

म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्राद्वारे केलेल्या सूचनांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काहीच महत्त्व न देता गोमंतकियांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत. त्यांनी उलट कर्नाटकलाच झुकते माप दिले आहे याचा गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन म्हादईच्या बचावासाठी रस्त्यावर उतरण्याची मागणी पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी केली.
पणजीतील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पालयेकर म्हणाले की, राज्याचे जलस्रोतमंत्री असताना मी हा म्हादईप्रश्न हाताळला होता. कर्नाटकने गोव्याकडील म्हादईचे पाणी कळसा – भांडुरा येथे वळविण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तेथे जाऊन पाहणी केली होती. तेथील कामाच्या ठिकाणी असलेली यंत्रसामग्री हलविण्यास कर्नाटकला भाग पाडले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईला माता असे म्हणतात मात्र त्याचा बचावासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश येत नाही. उलट ही म्हादई गोव्याच्या हातातून निसटली आहे. या म्हादईचे गोव्यातील अस्तित्वच नष्ट होण्याची पाळी आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माता म्हणून संबोधणाऱ्या म्हादईच्या बचावासाठी राजीनामा देऊन केंद्रीयमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध करावा. मातेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व गोमंतकियांच्या भावना केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज आहे. केंद्र सरकार सरकारची मागणी अमान्य करतात तर म्हादई गोव्याच्या हातातून गेली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे गोवा सरकारने म्हादईचा प्रश्न गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. राजीनामा देऊन त्यांनी म्हादईप्रश्नी रस्त्यावर उतरल्यास गोवा फॉरवर्ड त्यांच्याबरोबर असेल असे आमदार पालयेकर म्हणाले.
राज्यात कोरोना महामारीचे संकट तसेच पार्ट्यांना बंदी असताना हणजूण येथील एका हॉटेलातील पार्टीला परवानगी नसताना कारवाई का केली जात नाही. या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर केला होता तसेच मारहाणीचा प्रकारही घडला होता. सरकारच या ड्रग्ज पार्ट्या चालवितात असे दिसते. या पार्टीची माहिती हणजूण पोलिस निरीक्षक असल्याशिवाय ती होऊ शकत नाही. त्यामुळे या निरीक्षकालाच निलंबित करण्याची मागणी आमदार पालयेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना केली.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या