दिवाळीपासून विकासपर्व सुरु

The central government is positive to help the state
The central government is positive to help the state

पणजी : दीड वर्षांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील वर्षभरात विकासकामे गतीने मार्गी लावण्याची बेगमी आपल्या दिल्ली दौऱ्यात केली. त्यांनी अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन केंद्रीय योजनांचा लाभ गोव्याला मिळण्याची आश्वासने मिळवली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज बिहार विधानसभा निवडणूक निकालामुळे त्यांना भेट घेता आली नसल्याने राजकीय घडामोडी थोड्या लांबणीवर पडल्या आहेत. केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अनमोड घाट रस्ता रुंदीकरणाचे काम झाडे न कापता जेवढे करता येईल तेवढे करू, असे सांगितले आहे. दिल्लीतील या सर्व घडामोडींमुळे दिवाळीपासून विकासपर्वाला प्रारंभ होणार आहे.

दिल्लीतील यशस्‍वी घडामोडींनंतर मुख्यमंत्री आज सायंकाळी गोव्यात आले. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्याचे मुख्य सचिव परीमल राय आणि विशेष कार्य अधिकारी उपेंद्र जोशी होते. या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, विकासकामांसाठी केंद्रीय निधी आणि नाबार्डच्या निधीचा मार्ग या दौऱ्यात मोकळा झाला. यामुळे पुढील वर्षभरात विकासकामे सुरू ठेवण्यासाठी आणि नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. दोन दिवसांत गोव्याशी संबंधित सर्वच केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी झाल्या. पक्षाध्यक्षांची भेट झाली नाही, तरी त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले आहे. केंद्र सरकार राज्याला मदत करण्यासाठी सकारात्मक आहे. राज्यासमोरील काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या दौऱ्यात प्रयत्न केला आहे. त्याविषयीचे प्रस्ताव आता पाठवले जातील.


शेतकऱ्यांचे मांडले प्रश्‍‍न
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यात कृषीउपज उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना स्थापनेवर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय पडिक जमीन लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मदतीत वाढ करणे आदी मुद्देही चर्चेत आले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कारखान्यात आमुलाग्र बदल करण्यासाठी केंद्रीय योजनेतून मदत मिळेल काय? याविषयी चाचपणी केली. तोमर यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवले तर त्यांचा प्राधान्याने विचार करू असे नमूद केले.


रेल्‍वे दुपदरीकरण, आंदोलनावरही चर्चा
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात लोहमार्ग दुपदरीकरणाचा संबंध कोळसा वाहतुकीशी जोडून कसा विरोध केला जात आहे, याची माहिती दिली. लोहमार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही भागात सुरू आहे, त्याचाही उल्लेख या बैठकीत करण्यात आला. गोयल यांनी देशात सर्वत्र लोहमार्गाच्या दुपदरीकरणाची कामे सुरू आहेत. त्यानुसार हे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. राज्यात वस्तूंची आवक जावक वाढण्यासाठी लोहमार्गासारखा दुसरा पर्याय नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोयल यांच्याकडेच वाणिज्य व उद्योग खात्यांचाही पदभार असल्यामुळे कोविडोत्तर काळात राज्यात व्यापारउदीम वाढावा आणि उद्योगधंदे यावेत यासाठी राज्य सरकारने चालवलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. मरीटाईम क्लस्टरच्या उद्‍घाटनाची माहितीही त्यांनी गोयल यांना दिली.


नाबार्डचेही सहकार्य
मुख्यमंत्र्यांनी नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्यासोबतही बैठक घेतली. चिंताला यांनी गोव्याला नाबार्डकडून भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले, नाबार्डचा पतपुरवठा हा कमी व्याज दराने शिवाय दीर्घ मुदतीचा असतो. इतर राज्य सरकारने नाबार्डच्या निधीचा विनियोग उत्तम पद्धतीने करतात. त्या तुलनेत गोवा सरकार फारच कमी मागणी करते. त्यांनी यावेळी विकास प्रकल्पांत नाबार्ड पतपुरवठा करण्यास तयार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.

महामार्ग रुंदीकरण, झुआरी पुलाबाबत वेधले लक्ष 
केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी महामार्ग रुंदीकरण व झुआरीच्या पुलाच्या कामाविषयी त्यांच्याशी चर्चा केली. वरुणापुरी ते वास्को या उन्नत मार्गाच्या मूळ आराखड्यात रस्ता सुरक्षिततेच्यादृष्टीने काही बदल केल्याने या रस्ता बांधकामाचा खर्च वाढला आहे. तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोसावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला आणि महामार्गाचा हा टप्पा लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली. त्यावर गडकरी यांनी प्राधिकरणाने हा खर्च करणे आवश्यक असल्यास प्राधिकरणाने करावा, अशी सूचना या बैठकीत केली आहे. अनमोडवरून येणारा राष्ट्रीय महामार्ग गोव्याच्या हद्दीत रुंद करण्यास होत असलेल्या विरोधाची कल्पनाही मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांना दिली. झाडे कापण्यास जनतेचा असलेल्या आक्षेपाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना अवगत केल्यावर गडकरी यांनी रस्ते रुंद हवे की अरुंद हे स्थानिक पातळीवर ठरवा. हवे असल्यास झाडे न कापता जेवढे रुंदीकरण करता येईल तेवढे आता करू असा पर्याय सुचवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com