इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरील सेवा करात कपात शक्य; टाटा मोटर्सं, महिंद्रा अँड महिंद्राची कार बाजारात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

विजेवरील वाहन खरेदी केल्यास कर्जावरील व्याजात अडीच लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार असून, वाहन कर्जाने खरेदी केल्यास कर्जाच्या भरलेल्या व्याजावर दीड लाख रुपयांचा कर परतावा मिळणार आहे.

पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात विजेवरील (बॅटरीवरील) वाहनांवर भर दिला आहे. त्यानुसार भारताला विजेवर वाहन उत्पादनाचे केंद्र बनविण्याचा मानस आहे. तसेच विजेवर वाहनांचा वापर वाढण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून दिल्या जाण्याची शक्‍यता आहे.

लोकांनी वाहने खरेदी करावीत, यासाठी त्यांच्यावरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) १२ टक्‍क्‍यांवरून ५ टक्‍क्‍यांवर आणण्याचा प्रस्ताव आहे. (विजेवरील वाहनांसाठी आवश्‍यक असणाऱ्या सुट्या भागांवरील आयात शुल्क कमी करण्याचे संकेत मिळत आहेत.) विजेवरील वाहन खरेदी केल्यास कर्जावरील व्याजात अडीच लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार असून, वाहन कर्जाने खरेदी केल्यास कर्जाच्या भरलेल्या व्याजावर दीड लाख रुपयांचा कर परतावा मिळणार आहे. तसेच, विजेवर वाहनांचा वापर वेगाने वाढण्यासाठी फेमा २ योजनेसाठी केंद्र सरकारकडून १० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयांमुळे विजेवर वाहन निर्मितीला पोषक वातावरण निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयांमुळे इलेक्‍ट्रिक वाहने व पारंपरिक वाहनांच्या किमतीत असणारा फरक कमी होण्यास मदत होणार आहे.

टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र यांच्या इलेक्‍ट्रिक कार बाजारपेठेत उपलब्ध असून, अन्य वाहने इलेक्‍ट्रिकवर करण्यासाठी या कंपन्या काम करीत आहेत. बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस, मारुती सुझुकी, ह्युंदाई आदी कंपन्यांकडून अशी वाहने लॉंच होणार आहेत. विजेवर वाहन क्षेत्रात रिव्होल्ट इंटेलीकॉर्प, अथर एनर्जी, कायनेटिक ग्रीन एनर्जी, पॉवर सोल्यूशन्स आदी कंपन्या कार्य करीत आहेत. 

रिव्होल्टने आरव्ही ४०० ही मोटरसायकल बाजारपेठेत येणार आहे. सुझुकी लिथियम आर्यन बॅटरीचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारत असून, २०२० मध्ये येथे प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होईल, असे मारुती सुझुकीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तसेच, कंपनी इलेक्‍ट्रिक व हायब्रीड वाहनांची चाचणी करीत आहे. केंद्र सरकारकडून सुरू असणारे प्रयत्न, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात येत असणाऱ्या स्टार्टअप कंपन्या आणि आधीच्या कंपन्यांकडून सुरू असलेल्या चाचण्या यांचा विचार करता पुढील तीन ते सात वर्षांत देशात विजेवर व हायब्रीड वाहनांचे अनेक पर्याय पुढे येणार आहेत. तसेच, वाढत्या स्पर्धेमुळे चांगले तंत्रज्ञान असलेली वाहनेदेखील रास्त किमतीत मिळतील, अशी अपेक्षा आहे. पण, पायाभूत सुविधांची उभारणी आणि चार्जिंगचे दर यावर विजेवरील वाहनांचे यश अवलंबून आहे.

(क्रमश:)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या