केंद्र सरकारच्या ‘नगरवन योजने’मुळे मिरामार किनाऱ्याची धूप थांबणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारने ‘नगरवन’ योजना जाहीर केली असून पाच वर्षांत २०० ठिकाणी वनक्षेत्राचा पट्टा तयार करण्याचे निश्‍चित केले आहे.

पणजी: मिरामार ते करंजाळे या विस्तीर्ण अशा किनाऱ्याची होणारी धूप आता वाचण्याची शक्यता आहे. येथील वनराईला संरक्षण मिळणार असून, ही वनराई वाचविण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘नगरवन योजने’चा फायदा होणार आहे. अठरा हेक्टर क्षेत्रावर असलेल्या वनराईचे संरक्षण होणार असल्याने किनाऱ्याचीही धूप होणे वाचणार असल्याचे स्पष्ट आहे.

सध्या मिरामार किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झालेली नजरेस पडत आहे. सुरूच्या बनातील झाडेही समुद्राच्या लाटांमुळे उन्मळून पडलेली आहेत. केंद्र सरकारने मागितलेल्या प्रस्तावानुसार राज्य वनखाते आणि नगर विकास खात्याच्यावतीने मिरामार येथील वनक्षेत्र ‘नगरवन’ म्हणून विकसित करण्यासाठी सूचविले होते. या क्षेत्राची नुकतीच वनखात्याचे प्रमुख वनसंरक्षक, तसेच नगर विकास खात्याचे संचालक आणि इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. केंद्र सरकारने ‘नगरवन’ योजना जाहीर केली असून पाच वर्षांत २०० ठिकाणी वनक्षेत्राचा पट्टा तयार करण्याचे निश्‍चित केले आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित योजनते अशा क्षेत्रासाठी कमीत कमी दहा हेक्टर जागा असणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे गोव्यात चार ते पाच हेक्टर अशा क्षेत्रांचा समावेश करावा, अशी विनंती केली होती. शहरी वनक्षेत्रांना कुंपण घालण्यासाठी केंद्रीय वन, पर्यावरण खाते याचा खर्च उचलणार आहे. वृक्ष लागवड आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठीचा खर्च राज्य सरकारला सामाजिक संस्थांकडून उभारावा लागेल.

‘सुरू’ ऐवजी माड लावावेत...
केंद्र सरकारची योजना उत्तम आहे. ‘नगरवन'' क्षेत्राचा उपयोग केला तर लोकांना त्याचा निश्‍चित उपयोग होईल. सरकारने जाहीर केलेल्या योजनेमुळे या हरितपट्टा तयार होणार आहे. किनाऱ्याचे संरक्षण होईल, अशा झाडांची लागवड या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. सुरूची लागवड ही तात्पुरता उपाय आहे. त्याऐवजी माड किंवा येथे वाढतील अशाचा झाडांचा उपयोग करणे आवश्‍यक आहे, असे काही तज्‍ज्ञांना वाटते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या