गोवा: येत्या 4 दिवसात गोव्यात पावसाची शक्यता

गोवा: येत्या 4 दिवसात गोव्यात पावसाची शक्यता
goa rain.

पणजी : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज रविवारी राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने काही काळासाठी जनजीवन विस्कळित झाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. गेल्या शुक्रवारी सत्तरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा कर्नाटकला लागून असलेल्या भागात पावसाने हजेरी लावली. सत्तरी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. डिचोली, सांगे, काणकोण, होंडा तसेच मडगाव भागात देखील जोरदार पाऊस झाला. इतर भागातही तुरळक सरी बरसल्या.(Chance of rain in Goa in next 4 days)


घाटावर १.५ किलीमोटर प्रती तास वेगाने वारे वाहत आल्याचा हा परिणाम आहे, असे हवामान खात्याचे एम. राहुल यांनी सांगितले. चोर्ला घाटातही पावसाने दमदार हजेरी लावली. बेळगाव परिसराला पावसाने झोडपून काढले. पुढील तीन-चार दिवस ढगाळ वतावरणासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर वातावरण चांगले होते, पण सायंकाळी ढग जमून आले आणि त्वरित पावसाला सुरुवात झाली. परिणामी, बाजार पेठांमधील विक्रेते, व्यापारी आणि  प्रवासी यांची आसरा शोधताना पुरती दमछाक उडाली. एकंदर, पावसाने हजेरी लावल्याने उष्म्यात घट झाली आहे.

चार दिवस ढगाळ वातावरणाचा शक्यता
कर्नाटकात घाट माथ्यावर वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. थंडी जास्त आहे. त्यामुळे वारे अधिक वेगाने वाहत आहेत. राज्यात पुढील चार दिवस अशीच स्थिती राहील. वादळी वारे ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणार आहेत. 
- एम. राहुल, हवामान तज्ज्ञ

सांगेत पावसाची जोरदार हजेरी
सांगे भागात आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वारे व गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दक्षिण गोव्यात वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वीज खात्याने दुरुस्ती काम हाती घेतले होते. पण संध्याकाळी तासभर पाऊस पडताच वीज गायब होण्याचा प्रकार घडल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळी पावसाळी ढग दाटून येत असल्याने नागरिकांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात असताना साडेपाचच्या सुमारास जोरदार वारे आणि गडगडाटसह पावसाला सुरवात झाली. सांगेच्या उगे भाटीसह पुढील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस पडताच काजू दरात घसरण होत असल्याने आधीच काजू उत्पादन कमी त्यात यंदा दर कमी होत गेल्याने काजू उत्पादकात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. कुडचडे भागातसुद्धा हीच स्थिती पावसाने निर्माण केली होती. वारा, गडगडाट आणि पाऊस. किमान तासभर पावसाने वातावरण थंड करून टाकले होते. सांगे ते कुडचडेपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर साचला होता.

डिचोलीत अवकाळी पाऊस 
जोरदार वाऱ्यासह डिचोली शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला. दरम्यान, जोराच्या वाऱ्यामुळे नार्वेसह दोन ठिकाणी झाडांची पडझड झाली. मात्र, या पडझडीत मोठी वित्तहानी किंवा अन्य अनर्थ घडला नाही. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली. रविवारी सायकांळी ढगाळ हवामान तयार झाल्यानंतर साधारण सहा वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.  डिचोली शहरासह सर्वण आदी काही भागात जोरदार पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम झाला. पावसामुळे हवेतही काहीसा गारवा निर्माण झाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com