मुसळधार पावसाची शक्‍यता

dainik gomantak
सोमवार, 1 जून 2020

अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात व लक्षव्दिप क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

पणजी, 
वेध शाळेने दिलेल्‍या माहितीनुसार अरबी समुद्रात येत्‍या ४८ तासात कमी दाबाचा पट्‍टा तयार होण्‍याचे संकेत दिसत आहे. यामुळे महाराष्‍ट्र आणि गोवा समुद्रकिनारपट्‍टीवर वादळवार्‍यासह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. हवामानतज्ञांच्‍या मते मान्‍सुनसाठी पोषक वातावरण तयार होण्‍यासाठी सुरवात झाली आहे. सध्‍याचा वातावरण बदल हा मान्‍सूनच्‍या आगमनाचीच चाहुल देत आहे. 
वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी सकाळी पणजीसह विविध ठिकाणी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. राज्‍यातील वातावरण दिवसभर ढगाळ स्‍वरूपाचे होते. वेधशाळेने दिलेल्‍या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस 1 ते 3 जून पर्यंत जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. 
राज्यात रविवारी पणजी, म्हापसा, पेडणे, वाळपई, सांगे, केपे भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पणजीत सकाळी पाऊस पडला व त्यानंतर दिवसभर वातावरण दमट होते. संध्याकाळी पुन्हा पावसाने तूरळक हजेरी लावली. 
गेल्‍या चोवीस तासात कमाल तापमान 36.8 अंश सेल्सियस तर किमान तापमान 28.8 अंश सेल्सियस इतके वाढले होते व प्रचंड उकाडा जाणवत होता. वेधशाळेच्‍या अंदाजानुसार पुढील 48 तासात कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सियस तर किमान तापमान 26 अंश सेल्सियस इतकी घट होणार आहे.  
अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात व लक्षव्दिप क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 48 तासात याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या उत्तरेकडे वळणार असून तो 3 जून पर्यंत उत्तर महाराष्ट्र व गुजरात किनार्‍यावर पोचण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे पुढील 48 तासात अरबी समुद्रात 55 ते 65 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वादळी वार्‍याचा वेग वाढुन 100 ते 110 किलोमीटर प्रतीसास इतका तूफानी होऊ शकतो. समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 जून पर्यंत गोवा महाराष्ट्र किनारपट्टीतील समुद्रात न उतरण्याचा इशारा गोवा वेधशाळेने मच्छिमारांना दिलेला आहे.       
पणजीत रविवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्‍याने लोकांनी छत्री, रेनकोट सोबत घेतले होते. आयनॉक्स रस्त्यावरील भाजी बाजारात खरेदीसाठी येणार्‍या लोकांनी छत्र्या आणि रेनकोट सोबत घेतला होता. भाजी व फळ विक्रेत्यांनी देखील आपल्या साहित्यावर प्लास्टिकचे आच्छादन घालून पावसापासून बचावाची व्यवस्था केली होती. 
 

संबंधित बातम्या