उद्या ३ वाजल्यापासून पणजीत वाहतूक मार्गात होणार हा बदल

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या १९ व २० डिसेंबरच्या गोव्यातील भेटीदरम्यान आझाद मैदान व कांपाल येथील कार्यक्रमामुळे राजधानी पणजीतील वाहतूक मार्गबदल करण्यात आला आहे.

पणजी: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या १९ व २० डिसेंबरच्या गोव्यातील भेटीदरम्यान आझाद मैदान व कांपाल येथील कार्यक्रमामुळे राजधानी पणजीतील वाहतूक मार्गबदल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या काळात दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. मांडवीत बंदर कप्तान कार्यालय ते मिरामारपर्यंत तसेच झुआरी नदीत राजभवनाच्या आसपास भ्रमंती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी ३ वाजल्यापासून हा वाहतूक मार्गबदल लागू होणार आहे.

१९ डिसेंबरला कदंब बसस्थानकाहून पणजीत शहरातून मिरामार येथे जाणारी वाहतूक जुन्या सचिवालयाजवळील बांदोडकर पुतळा येथून वळवून जोझ फालकाव रस्ता, चर्चचौक, एबी रस्ता, पालासिओ दी गोवा - सांतिनेझ जंक्शन, सांतिनेझ चर्च, अग्निशमन दल जंक्शन, हॉटेल इंटरनॅशनल, आदर्श सर्कल व जुन्या करंझाळे रस्त्यावरून पुढे जाणार आहे. त्याचप्रमाणे मिरामार व दोनापावल येथून येणारी वाहने याच मार्गाने सांतिनेझ जंक्शनपर्यंत येऊन १८ जून रस्ता, कॉमर्स पॉईंट व कस्टम हाऊसकडून कदंब बसस्थानकाडे पाठविली जाणार आहे. हा वाहतूक मार्गबदल दुपारी ३ वाजल्यापासून ते कांपाल मैदानावरील राष्ट्रपतींचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू असेल. 

एम. जी. रस्त्याच्या लेखा संचालनालय ते कासा धेंपो, बांदोडकर पुतळा ते कांपाल गणेश, कांपाल गणेश ते एनआयओ सर्कल ते राजभवन, कोको बार ते रिअल एजन्सी, उद्योग भवन ते वर्षा बुक स्टॉल, पणजी फेरी धक्का जंक्शन ते मिश्र पेढा, प्रिंटींग प्रेस जंक्शन ते गोविंदा बिल्डिंग ते हिरो होंडा शोरूम येथील रस्ता वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

आझाद मैदानावरील कार्यक्रम संपल्यानंतर कदंब बसस्थानकाहून येणाऱ्या वाहनांसाठी कला अकादमीपर्यंत रस्ता खुला केला जाईल व ही वाहने कला अकादमीकडून वळवून सांतिनेझ जंक्शन दिशेने पाठविली जातील तसेच दोनापावल येथून आलेली वाहने कला अकादमी येथे वळवून बसस्थानकाकडे पाठविली जातील. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत त्यांनी एक तास अगोदर यावेत कारण कार्यक्रमाकडे येणार मार्ग हा निर्बंधित करण्यात आला आहे.

आणखी वाचा:

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचा विकासदर सर्वोत्कृष्ट : मुख्यमंत्री -

संबंधित बातम्या