गोवेकरांचा सण चवथीचा

संजय घुग्रेटकर
रविवार, 23 ऑगस्ट 2020

गोमंतकीय माणूस हा मुळातच उत्सवप्रिय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गोव्यात वर्षभर सण, उत्सव साजरे होत असतात. गोव्यात साजरे होणाऱ्या इतर अनेक सणांमध्ये "सणांचा राजा'' हे अभिधान कुठल्या सणाला द्यायचे ठरवले तर ते निःसंशयपणे गणेश चतुर्थीला द्यावे लागेल. 

पुण्यभूमी गोमंतकात गणेशभक्तीची परंपरा चंद्रगुप्त मौर्य राजवटीच्या काळापासून सुरू झाली असे इतिहासकारांचे मत आहे. इसवीसनाच्या चौथ्या व पाचव्या शतकातील जीर्ण झालेल्या परंतु वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आजही गोव्यात पहायला मिळतात. बदामीच्या तालुक्‍यांनी आपल्या राजवटीत गणेशाला अग्रस्थान दिले होते. गोव्यावर राज्य करणाऱ्या चालुक्‍याची राजधानी रेडी होती. तेथे आजही तत्कालीन काळातील जांभ्या दगडात कोरलेली गणेशप्रतिमा आहे. त्यानंतर गोव्यावर राज्य केलेल्या शिलाहार, कदंब, विजयनगरच्या राजवटीतही श्रीगणेश पूजेला अग्रस्थान होते. त्यामुळेच आजही गोवेकरांचा मुख्य सण गणेशचतुर्थीच आहे.

एरवी गोमंतकीय बोलीत चतुर्थी म्हणजे "चवथ''. पण गोव्यात एकूणच गणेशोत्सवाला "चवथ'' म्हणून संबोधले जाते. गोव्यात चतुर्थी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. गरीब, श्रीमंत, उच्चवर्णीय, आस्तिक, नास्तिक सगळेच या सणाला एकत्र येतात. या काळात कोठेही जात नाहीत, सर्वच व्यवहार बंद असतात.

गोव्यातील चवथ भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीला सुरू होते, पण तिची समाप्ती एकाच दिवशी होत नाही. चवथीचा उत्सव मखरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून सुरू होतो आणि गावातल्या नदीत, तळ्यात, विहिरीत किंवा ओढ्यात त्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर संपतो. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्‍ल पंचमीला श्रीगणरायाचे विसर्जन केले जाते. याला दीड दिवसांची "चवथ' म्हणतात. तर ठिकाणी पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या दिवशी चवथीची समाप्ती होते. क्वचित ठिकाणी एकवीस दिवसही गणेश पूजन केले जाते. तर काही समाजात वर्षभरही गणेशमूर्ती ठेवली

जाते. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा केली केली जाते. यावेळी आरती म्हटली जाते. गोव्यात आरती हा प्रकारही वैशिष्ट्यपूर्ण आहे. झांज, घुमट वाजवून आरती म्हटली जाते. साग्रसंगीत आरतीसाठी समेळ, घुमट, कासाळे घेऊन किंवा पेटी, पखवाज, झांज घेऊन आरती म्हटली जाते. ग्रामपातळीवर आरती म्हणणारा मोठा गट निर्माण होतो आणि अनेक आरत्या गणेश पूजेला म्हटल्या जातात. एकूणच गोमंतकीय "चवथ'' आगळ्या वेगळ्या प्रकारे मनोभावे साजरी
केली जाते.

खास गोमंतकीय "माटोळी"
गणेशमूर्तीला मखरात बसविण्याआधी माटोळी बांधली जाते. "माटोळी'' हा प्रकार फक्त गोवा आणि तळकोकणात आढळतो. कोकणात त्याला माटवी असेही म्हणतात. ही माटोळी मखराच्या पुढे छताला टांगून बांधली जाते. बांबूच्या काठ्यापासून सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराचा सांगाडा आधी तयार केला जातो. तो छताला बांधला की या माटोळीला सर्वप्रथम मध्यभागी बांधली जाते, ती पाच, सात किंवा नऊ नारळांची पेंड. ती न मिळाल्यास मोठ्या आकाराचा न सोललेला नारळही बांधला जातो. त्यानंतर माटोळीच्या चारही कडांना आम्रपर्णांच्या डहाळ्या बांधल्या जातात. जंगलात किंवा डोंगरावर सापडणारी कांगलां, कुंडळां, नागूूचे कुडे, घागऱ्या, पोफळीचा कातरा अशा अनेक वस्तू माटोळीला टांगल्या जातात. त्या बांधण्यासाठी दोरी किंवा सुंभ वापरला जात नाही. त्याऐवजी केवणीचे दोर वापरले जातात. दुधी भोपळा, घोसाळी, तवशी, केळ्यांचा घड, मक्‍याचे कणीस, पेरू, सफरचंद, डाळिंब या सारखी निसर्गाची देणही माटोळीला बांधले जाते. आकर्षक माटोळी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार व स्थानिक संस्था, क्‍लबतर्फे स्पर्धाही घेतली जाते.

चवथीचे "ओझे''
देशातील इतर प्रांतात नवीनच लग्न झालेल्या मुलीला माहेरून काही वस्तू देण्याची पद्धत आहे. परंतु गोव्यात "ओझे'' (वजे) पद्धत वेगळी आहे. अशा पद्धत देशावर दिसत नाही. गोव्यात मुलाच्या घरून जावयाच्या घरी वजे पाठवण्याचा रिवाज आहे. या वझ्यात करंजा, लाडू व इतर फराळ, फळफळावळ इत्यादी सोबत माटोळीला लागणारे लाकडी सामानही पाठवले जाते. 

ही लाकडी फळफळावळ बहुधा सावंतवाडीवरून आणली जाते. वस्तूंसोबत या लाकडी वस्तूही माटोळीला बांधण्यात येतात. रूढी, परंपरा पिढ्यान्‌पिढ्या चालत आल्या आहेत. त्यापैकी "ओझे''ही पद्धती रिवाज असून मायेचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून "ओझे'' पद्धत रूढ झाली असावी. परंतु अलीकडच्या काळात या ''ओझ्या''ला खूपच प्रतिष्ठा प्राप्त झाली असून प्रचंड खर्च केला जात आहे. ''ओझे'' तयार करण्याचा व्यवसायही तयार झाला आहे. त्यामुळे घरात अधिक कष्ट करावे लागत नाहीत, फक्त पैसे मोजावे लागतात. तरीसुद्धा या रितीला थोडी मर्यादा घालायला हरकत नाही.

ऋषी पंचमी
चवथीचा दुसरा दिवस पंचमी. हा "नव्याची पूजा'' करण्याचा दिवस. "नव्याची'' म्हणजे शेतातील नव्या कणसांची पूजा. यासाठी शेतावर जाऊन कणसाच्या लोंब्या आणतात. त्या आंब्याच्या पानात गुंडाळून एका पाटावर ठेवतात व त्यांची गंधफूल वाहून पूजा करतात. त्याला ऋषी पंचमी असेही म्हणतात.

गणेशोत्सवातील खाद्यसंस्कृती
गणेशोत्सवात मोदकाबरोबर गोव्यात नेवऱ्या (करंज्या) असतात. गोमंतकीय महिलांनी बनविलेल्या करंज्या वेगळ्याच असतात. त्यांना गोमंतकीय वेगळी "चव'' असते. त्यातही ओल्या पुरणाच्या, किसलेल्या नारळापासून केलेल्या पंचखाद्याच्या, रव्याच्या पिठाच्या, तिखट पिठाच्या अशा प्रकारांचा समावेश आहे. नेवऱ्या प्रमाणेच पुरणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. मुगाचे लाडू, चून घातलेली मुठली, पातोळ्या, गोड पोहे, गुळाच्या पाकातले पीठ आवळे असे प्रकारही नैवेद्यात वापरले जातात. दुपारच्या जेवणात गोड पदार्थांची अक्षरशः रेलचेल असते. खीर, मणगणे, सोजी आणि गोडशे हे गोमंतकीय पदार्थ. सोबत तळलेल्या पुऱ्या, वडे, भाज्यांमध्ये घोसाळ्याची भाजी, भेंडीची भाजी, केळीची किंवा सुरणाची भाजी, कोबीची भाजी, शेवग्याच्या किंवा दुधयाच्या फुलाची भाजी, निरफणसाची भाजी असते. या शिवाय इतरही अस्सल गोमंतकीय पदार्थ, स्थानिक भाज्या केल्या जातात.

माशेल-कुंभारजुवेचा सांगोड
माशेल-कुंभारजुवेतील नदीत सात दिवसीय सांगोडोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माशेल येथील शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरातील सात दिवशीय गणेशमूर्तीचे विसर्जन कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या फाट्यात केले जाते. त्यावेळी गावातील काही गणेशमूर्ती सांगोडावर ठेवल्या जातात. सांगोड सजविले जातात. दोन होड्यांना एकत्र बांधून सांगोड तयार केला जातो. या सांगोडावर देवदेवतांच्या मूर्ती ठेवून आकर्षक देखावे केले जातात. अलीकडच्या काळात स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत पौराणिक, आधुनिक वेशभूषेत विविध देखावे सादर केले जातात. हा सोहळा प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच सांगोड म्हणजे काय ते समजते. त्यामुळे दरवर्षी भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या माशेल व कुंभारजुवेच्या दोन्ही तिरावर मोठी गर्दी करतात.

संबंधित बातम्या