गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांची ईओसीकडून चौकशी

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

गोवा क्रिकेट असोसिएशनधील (जीसीए) कोट्यवधीच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) चार वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला आहे.

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनधील (जीसीए) कोट्यवधीच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) चार वर्षापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन देसाई हे कक्षाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या अधिकाऱ्यांनी त्याची सुमारे दीड तास कसून चौकशी करण्यात आली. पुढील आठवड्यात या प्रकरणातील इतर संशयितांना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

२०१६ साली या कक्षाने असोसिएशनमधील ३.३१ कोटी घोटाळाप्रकरणी गुन्हा नोंद केला होता तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, माजी सचिव विनोद फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी पर्वरी येथील असोसिएशनच्या कार्यालयाची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त केला होता. चौकशीसाठी चेतन देसाई, विनोद फडके तसेच अकबर मुल्ला या तिघांनाही अटक झाली होती.

 
असोसिएशनला क्रिकेटसाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप या तिघा संशयिताविरुद्ध ठेवण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक चौकशीत पोलिसांना घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. निधीचे धनादेश संशयिताने स्वतःच्या बँक खात्यावर जमा करून पैसे उकलले होते. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या नियमांनुसार प्रक्रिया करण्यात आली नाही. 

आर्थिक गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित चेतन देसाई यांना या घोटाळाप्रकरणातील व्यवहारासंदर्भात अनेक प्रश्‍न विचारण्यात आले मात्र ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांनी दिलेल्या उत्तराची शहानिशा इतर संशयितांची चौकशीत केली जाणार आहे.

संबंधित बातम्या