छत्रपती शिवाजी महाराज मैदान बंदावस्थेत

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

‘कोविड’ संकटामुळे  बंदावस्थेत असलेले आणि डिचोली शहराचे वैभव असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता काही दिवसांनी खुले होण्याचे संकेत आहेत. या मैदानावर वाढलेली हिरवळ कापण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.

डिचोली: ‘कोविड’ संकटामुळे  बंदावस्थेत असलेले आणि डिचोली शहराचे वैभव असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता काही दिवसांनी खुले होण्याचे संकेत आहेत. या मैदानावर वाढलेली हिरवळ कापण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. टाळेबंदीनंतर केवळ मागील स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी एक दिवस वगळता मागील सात महिन्यांहून अधिक काळापासून हे मैदान आजतागायत खेळण्यासाठी वा कार्यक्रमांच्या वापरासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एरव्ही सकाळी आणि सायंकाळच्यावेळी गजबजणाऱ्या या मैदानावर सामसूम आहे. 

विकसीत कामाचे उद्‌घाटन करण्यात आल्यापासून  मैदानाच्या वापरावर आधीच निर्बंध आले आहेत. त्यातच कोविड संकटामुळे टाळेबंदी लागू झाल्यापासून या मैदानाच्या वापरावर निर्बंध आले आहेत. टाळेबंदीपासून या मैदानाची फाटके उघडण्यात आलेली नाहीत. आता टाळेबंदी उठवल्याने काही दिवसांनी है मैदान खेळ आणि मर्यादित कार्यक्रमांसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. 

शहराचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज मैदान
खेळांबरोबरच अनेक कार्यक्रमांचे साक्षीदार असलेल्या या मैदानाला मोठा इतिहास आहे. डिचोली ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून ओळखण्यात येते. त्यामुळेच या मैदानाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. फुटबॉल खेळासाठी उपयुक्‍त असलेल्या या मैदानाने डिचोली शहराला अनेक खेळाडू दिले आहेत. शहरातील जे काही फुटबॉलपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  पातळीवर चमकले आहेत ते खेळाडू याच मैदानावर घडले आहेत.

तीन वर्षांपूर्वी सरकारच्या सुवर्णमहोत्सवी निधीतून २ कोटींहून अधिक रुपये खर्चून या मैदानाला नवा साज देण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या मैदानाच्या विकसीत कामाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. नवा साज देण्यात आलेले आणि शहराचे वैभव असलेल्या डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रीडा स्पर्धा आदी कार्यक्रमांसह सरावानिमित्त विशेष करून उभरत्या मुलांसाठी उपयुक्‍त ठरले आहे.

संबंधित बातम्या