शिवरायांचा पुन्‍हा अवमान! ...आणि असंतोष पसरला!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

गोव्यात काही लोकांना हिंदूना (मराठ्यांना) बदनाम केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, गोवा पर्यटन खात्याने मराठ्यांना आक्रमक म्हणून ट्विट केले आहे. मराठे होते, मराठे लढले म्हणून आपण अस्तित्वात आहोत.

पणजी : आग्वाद किल्ला या पर्यटनस्थळाची ट्विटरवर पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहिरातबाजी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप काल दिवसभर राज्य सरकारला झेलावा लागला. अखेर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हे कोणी केले याची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले.

दिवसभर समाज माध्यमांवर सरकारविषयी संताप व्यक्त करण्यात येत होता.
कळंगुट येथे तारखेनुसारच्या शिवजयंतीदिनी काढण्यात येणाऱ्या फेरीला प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली होती. यामुळे शिवप्रेमींत भाजप सरकारविरोधात मोठी नाराजी होती. त्यांनी तिथीनुसारच्या शिवजयंतीदिनी म्हापसा ते कळंगुट अशी भव्य यात्रा काढून आपली ताकद दाखवून दिली. ती यात्रा अडवण्याची हिंमत कोणी करू शकला नव्हता. 

सत्ताधारी इतिहास विसरले का?

भाजप सरकारच्या तोडमोड इतिहासाच्या धोरणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अवमान करण्यात आला असून, शूर व पराक्रमी मराठ्यांना ‘आक्रमणकर्ते’ संबोधण्याचे घृणास्पद काम गोवा सरकारने केले आहे. पर्यटन खात्याने नंतर केलेल्या सारवासारवीत पोर्तुगीजांचा उदो उदो करण्याचा प्रयत्न झाला आहे. हाच का भाजपचा नवा इतिहास आहे, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते कामत यांनी विचारला आहे. शूर मराठा साम्राज्याला ‘आक्रमणकर्ते’ संबोधणाऱ्या गोवा सरकारचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे सांगून कामत यांनी सरकारने जनतेची व स्वाभिमानी देशभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

राष्‍ट्रप्रेमाने भारावलेले वातावरण! गोवा मुख्‍यमंत्र्यांची 7.5 कि.मी. पायपीट

योगदान विसरणार नाही..!

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे गोमंतभूमीसाठी खूप मोठे योगदान आहे. स्वाभिमानी गोवेकर ते कदापी विसरू शकत नाही. भाजप सरकारने मराठा साम्राज्याचा अपमान करणे हे दुर्दैवी आहे, असे कामत यांनी म्हटले आहे. २०१२ मध्ये गोव्यात व सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने भारत देशाचा गौरवशाली इतिहास बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आहे.

कठोर कारवाई व्‍हावी

पर्यटन खात्याने गोमंतकाच्या वैभवशाली इतिहासाचा विपर्यास करण्याऐवजी पर्यटनस्थळे स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यावर भर द्यावा. समाजमाध्यमावरून छत्रपतींच्या मराठा साम्राज्याचा करण्यात आलेल्या अपमानाला जबाबदार कोण? याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्‍हणाले.

काय केले ट्विट...

पर्यटन खात्याच्या ट्विटर हॅण्डलवरून आग्वादचे कारागृह हे सुंदर अशा आग्वाद किल्ल्याचा भाग आहे. तो १६१२ मध्ये बांधण्यात आला. त्या किल्ल्याने पोर्तुगीज सत्तेचे ‘डच आणि मराठा आक्रमकां’पासून रक्षण केले. हा किल्ला वरचा किल्ला व खालचा किल्ला या दोन भागात विभागला आहे, अशी माहिती प्रसारीत केली.

गोवा रूग्णालय केंद्रांना सज्जतेचे निर्देश; कोविडच्‍या दुसऱ्या लाटेची शक्‍यता 

...आणि असंतोष पसरला!
पर्यटन खात्‍याने ट्विट केल्‍यानंतर शिव छत्रपतीप्रेमींत संतापाची आग लागली. त्यांनी सरकारने याप्रकरणी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी समाज माध्यमावर करणे सुरू केले. त्यानंतर पर्यटन खात्याने ते ट्विट काढून टाकले. डच आक्रमकांविरोधात हा किल्ला अभेद्य राहिला, असे म्‍हणायचे होते अशी सारवासारव ट्विटरच्या माध्यमातून करण्याचा पर्यटन खात्याचा प्रयत्न होता. मात्र, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यानी हा विषय दिवसभर लावून धरला. त्‍यांनी याविषयी ट्विट तर केले…

पर्यटनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

गोव्यात काही लोकांना हिंदूना (मराठ्यांना) बदनाम केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, गोवा पर्यटन खात्याने मराठ्यांना आक्रमक म्हणून ट्विट केले आहे. मराठे होते, मराठे लढले म्हणून आपण अस्तित्वात आहोत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. पोर्तुगीजधार्जिणे काही महाभाग छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आक्रमक’ म्हणत आहेत. पर्यटन खात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. याची जबाबदारी स्‍वीकारून पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली. पर्यटन खात्याने केलेल्या ट्विटमध्ये मराठ्यांना आक्रमक म्हटले. ज्याने कोणी हे दुष्कृत्य केले आहे, त्याचा गोवा सुरक्षा मंच तीव्र शब्दांत निषेध करत आहेत, असेही फळदेसाई म्हणाले.

सरकारचे पितळ उघडे पडले : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आपण पुरातत्व खात्याचा मंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. महाराजांनी ३५२ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आता महाराजांना सरकार किती सन्मान देते त्‍याचे पितळ या ट्विटवरून उघडे पडले आहे.
 

 

संबंधित बातम्या