‘खाण’प्रश्‍न दिल्लीत सुटणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीत संघटनात्मक बैठकीला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रवाना झाले. दौऱ्यात ते काही केंद्रीयमंत्र्यांनाही विविध विषयांबाबत भेटणार असून त्यामध्ये खाण व्यवसायाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची ही दिल्लीतील भेट महत्त्वाची ठरणार आहे. 

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीत संघटनात्मक बैठकीला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रवाना झाले. या बैठकीदरम्यान ते राज्यातील जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते काही केंद्रीयमंत्र्यांनाही विविध विषयांबाबत भेटणार असून त्यामध्ये खाण व्यवसायाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची ही दिल्लीतील भेट महत्त्वाची ठरणार आहे. 

राज्यात निवडणुका होणार असल्याने स्थानिक लोकांकडून केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांना जोरदार विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनेक विषयांवर संबंधित केंद्रीय मंत्र्याबरोबर भेट ठरविलेली आहे. राज्याच्या खात्यामधील विविध प्रश्‍नांबाबतही संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत राज्यातील निवडणुकीसंदर्भात केंद्राची भूमिका याबद्दलही ते वरिष्ठ नेत्यांशी व केंद्रीय समितीशी बोलणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी दिली. 

कसिनो व्‍यवसाय सुरू झाल्‍यावर थकबाकी वसुली

राज्यातील कसिनो व्यवसायाला सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्यांची मागील सात महिन्यांचे शुल्क घेण्यात आले नाही. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्टीकरण करताना सांगितले की, सध्या हा व्यवसाय सुरू होणे महत्त्वाचे होते त्यामुळे त्यांच्याकडून सध्या एका महिन्याचे शुल्क आकारण्यात आले आहे व हा व्यवसाय सुरळीत झाल्यावर मागील थकबाकीही घेतली जाईल. 

धमकीचे मेसेज आंतरराष्‍ट्रीय ‘कॉल’

अनोळखी व्यक्तींकडून धमकीवजा खंडणीचे मेसेजस येत आहेत. त्यासंदर्भात सरकारने कोणती कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की, मला आलेल्या धमकीच्या मेसेजची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धमकीवजा खंडणीचे मेसेज आल्यानंतर इतर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही अशाच प्रकारचे मेसेज आल्याने पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे सर्व मेसेज आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांवरून येत आहेत. त्यामुळे त्याचा शोध लावणे पोलिसांसमोर दिव्य काम आहे. त्यामुळे या तक्रारींचा तपास सुरू असला तरी हे मेसेज पाठवणाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचतील की नाही याबाबत शंकाच आहे. 

निवडणूक रणनीती ठरविणार?

राज्यात जिल्हा पंचायती, पालिका व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिरे सुरू करून पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू करून सक्रीय झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रचारास सुरवात केली आहे. जिल्हा पंचायती तसेच नगरपालिका निवडणुका ही विधानसभेची सेमिफायनल असल्याने पुढील विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या दिल्लीतील बैठकीवेळी मुख्यमंत्री हे भाजपच्या केंद्रीय समितीकडून दिशा व मार्गदर्शन घेण्याची शक्यता आहे. 
जिल्‍हा पंचायत 

निवडणुका डिसेंबरमध्‍ये?

विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष असले तरी भाजपने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण प्रत्येक मतदारसंघातील गावातील कार्यकर्त्यांना ते पक्षाची दिशा व योजना सांगणार आहेत. या मंडळ प्रशिक्षण शिबिरामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतःहून सक्रिय झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा पंचायत निवडणुका व पालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे.

आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर वस्‍तुस्‍थिती मांडणार

दिल्लीच्या भेटीवर गेलेले मुख्यमंत्री डॉ. सावंत हे कोळसा प्रकरण, दुपदरी रेल्वे मार्ग, मेळावली आयआयटी प्रकल्प, मोले येथील तीन प्रकल्प, मरिना प्रकल्प, मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी प्रश्‍न अशा अनेक विषयांवरही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मते जाणून घेणार आहेत. स्थानिक लोकांनी आंदोलने सुरू केल्याने भाजप सरकारला लक्ष्य गाठणे कठीण होत आहे. या परिस्थितीची पूर्ण माहिती केंद्र सरकारला ते या भेटीत देणार आहेत. 

 

संबंधित बातम्या