मुख्‍यमंत्र्यांच्‍या दुर्लक्षाबद्दल गोव्याच्या आमदार एलिना साल्‍ढाणांची सरकारवर टिका

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

पश्‍चिम रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे दक्षिण गोव्यातील होणारा विद्‍ध्वंस व दुर्दशेचे तसेच जनतेचे काहीच सोयरसुतक नसल्यासारखे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वागतात,

कुठ्ठाळी : पश्‍चिम रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे दक्षिण गोव्यातील होणारा विद्‍ध्वंस व दुर्दशेचे तसेच जनतेचे काहीच सोयरसुतक नसल्यासारखे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वागतात, ते पाहून आपल्याला खरोखरच आश्‍चर्य होत असल्याचे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्रीमती एलीना सालढाणा म्हणतात की, रेल्वे दुपदरीकरण ग्रामविरोधी कृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांच्या कार्यालयामध्ये कमीच कमी तीन ते चार वेळा भेटून उद्‍भवणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. तेव्हा या पश्‍चिम रेल्वे दुपदरीकरणामुळे कसा विद्‍ध्वंस व दुर्दशा होईल ते स्पष्ट करण्यात आले होते. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍याबद्दल नाराजी व्‍यक्‍त केली आहे. उलट ते कोळसा वाहतुकीचा प्रमाण कमी करण्याची भाषा करीत असल्‍याबद्दल त्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली.
राज्यामध्ये होऊ घातलेल्या तीन मुख्य प्रकल्पांमुळे गोव्याचे अतोनात नुकसान होऊन विद्‍ध्वंस होईल. त्‍यामुळे मुख्यमंत्र्यानी प्रकल्‍पस्‍थळाला भेट देऊन एकंदरीत परिस्‍थितीचा आढावा घ्‍यावा. तसेच दुपदरीकरणामुळे जनतेच्या घरांवर कशी संक्रात येईल, याबाबत प्रत्‍यक्ष पाहावे व नंतरच दुपदरीकरणाचा विचार करावा, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

रेल्वे मार्गाच्या बाजूला राहणाऱ्या लोकांच्या पूर्वजांनी याच रेल्वेसाठी शंभर वर्षांपूर्वी आपल्या मालकीची जमीन दिली होती. तेव्हापासून ते आजपावेतो  रेल्वेने या लोकांच्या कल्याणासाठी काहीच केले नाही. ते सोडून आता दुसऱ्यांदा या लोकांचे जीवन पुन्‍हा उद्‍ध्‍वस्‍त करण्याचा प्रयत्न करीत होत असून लोकांची घरे तसेच संरक्षक भिंतीचेही नुकसान होणार आहे. एखाद्या विकासामुळे जनतेचे जीवनमान उंचावले पाहिजे. तेव्हाच त्याला खरा विकास म्हणता येईल. राज्यसरकार या विद्‍ध्वंसाचे कारण ठरू नये तसेच पर्यावरणाला बाधा ठरू नये. शिवाय दक्षिण गोव्यातील जनतेचे नुकसान न होता सांस्कृतिक वारसाचे जतन होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या