मुख्यमंत्री डॉ. सावंत कार्यकाळ पूर्ण करतीलच : ग्लेन टिकलो

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

अतिशय नीच पातळी गाठत टीका-टिप्पणी करून मुख्यमंत्री सावंत यांना बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणे कुणालाही शक्य होणारच नाही, याची आपल्याला खातरी आहे, असेही ग्लेन टिकलो म्हणाले.

म्हापसा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर भलतेसलते आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने होत असला तरी मुख्यमंत्री विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करतीलच, असा ठाम विश्वास हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी व्यक्त केला.

अतिशय नीच पातळी गाठत टीका-टिप्पणी करून मुख्यमंत्री सावंत यांना बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणे कुणालाही शक्य होणारच नाही, याची आपल्याला खातरी आहे, असेही ते म्हणाले.

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर व पक्षाचे पदाधिकारी शिवानंद शिरोडकर यांच्या उपस्थितीत म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार टिकलो पुढे म्हणाले, आमचे मुख्यमंत्री सावंत हे सध्या चांगल्यापैकी काम करीत आहेत. परंतु, कोविडच्या रूपाने आलेल्या महामारीमुळे त्यांचे लक्ष थोडेसे विचलित झाले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. गोव्यात कोविडमुळे सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला असून, त्यामुळे आर्थिक व्यवहारांना खीळ बसलेली आहे. तरीही ते त्या बिकट परिस्थितीतून गोवा राज्याला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भाजपा हा समता पाळणारा पक्ष असल्याचे नमूद करून, आमदार टिकलो म्हणाले, देशात व गोव्यातही हा प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. अन्य कित्येक राज्यांत भाजपाची सत्ता आहे. हा पक्ष सर्व समाजघटकांना पुढे घेऊन जाणारा पक्ष असल्यानेच या पक्षाला यशप्राप्ती झालेली आहे. भंडारी समाजाच्या नावाचा स्वहितासाठी गैरवापर करून भाजपाविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे.

ज्ञातिसंस्थेचा आधार घेऊन कोणत्याही राजकीय नेत्याने समाजात दुफळी माजवू नये, असे आवाहन त्यांनी केले. अल्पसंख्याक वर्गातील व्यक्ती असूनही आपल्याला हळदोणे मतदारसंघात बहुसंख्येने असलेल्या हिंदुबांधवांनी निवडून दिले, याचे कारण म्हणजे भाजपा हा सर्व वर्गांतील लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रहित साधणारा पक्ष आहे, असा दावा टिकलो यांनी केला.

भाजपा हा जनतेचा पक्ष आहे. म्हणूनच विविध घटकांतील लोकांसाठी या पक्षाने सर्वसमावेशक अशा योजना राबवल्या, असेही ते म्हणाले.

अमली पदार्थ व्यवहारांची पाळेमुळे शोधणार : सोपटे
वागातोरमधील रेव्ह पार्टीशी मुख्यमंत्री सावंत व कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा संबंध असल्याचा दावा केल्याबद्दल आमदार दयानंद सोपटे यांनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा निषेध केला. ते नेहमीच खोटे बोलत असल्याने आतापर्यंत त्यांचा सातत्याने पराभवच होत आला आहे, असा दावा करून, ‘‘या अमली पदार्थ व्यवहारांची पाळेमुळे मी शोधून काढणारच’’, असेही ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या