गोवा सरकारचा म्हादई नदिचा प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सुटणार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

म्हादई नदीचे पाणी कर्नाटक पळवत असल्याचा गोवा सरकारचा आरोप असताना आणि हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकाने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

पणजी :म्हादई नदीचे पाणी कर्नाटक पळवत असल्याचा गोवा सरकारचा आरोप असताना आणि हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकाने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकाचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांशी त्याविषयी चर्चा केली. दोन्ही राज्‍यांनी मिळून उभयमान्य तोडगा काढावा असे पाटील यांनी सुचवले आहे.

राज्य सरकारने याविषयी कडक भूमिका घेतली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई नदीच्या पात्रातील पाण्याची क्षारता मोजणे गोवा सरकारच्या विनंतीवरून सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले, की कोणाचेही काहीही प्रयत्न असले तरी न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पाटील हे तोडग्यासाठी प्रयत्न करत आहेत याविषयी काल मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली असता नंतर बोलू असे ते म्हणाले होते तर आज त्यांनी त्याविषयावर विचारल्यावरही भाष्य केले नाही.

पाटील यांचे स्वीय सचिव सहायक सुनील देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांची पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेद उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः कर्नाटकासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यासाठी पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान म्हादईवर चर्चा झाली आणि पाटील यांनी उभयमान्य तोडग्याची विनंती केली. ही बैठक २५ मिनिटे चालली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी असे पाटील यांनी सुचवले आहे. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल व वेलदोड्यांपासून बनवलेला म्हैसूर हार घालून सन्मान केला.

पाटील यांनी या बैठकीनंतर सांगितले, की कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे विचार मी गोव्‍याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहेत, त्यांनीही आपले म्हणणे मला सांगितले आहे. ते मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. दोन्ही राज्यांचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात असे आम्हाला वाटते. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

संबंधित बातम्या