गोवा अल्पसंख्याक आयोग स्थापण करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिले आश्वासन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

गोवा अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

पणजी: गोवा अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे, अशी माहिती भाजपचे अतिरीक्त प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी येथे दिली. त्यांनी आज भाजपमध्ये काल प्रवेश केलेल्या महमद इक्बाल यांच्यासह मुख्यमंत्र्यांची आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

मुल्ला म्हणाले, अल्पसंख्याकांचे सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांनी त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणे सुरू केले आहे. आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. त्यातील आयोगाची स्थापना ही महत्त्वाची मागणी आहे. ती लवकर पूर्ण केली जाणार आहे. यामुळे पालिका निवडणुकीनंतर अल्पसंख्याक समाजाचे हजारो जण भाजपमध्ये प्रवेश करतील. १५ विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांची निर्णयाक मते आहेत आणि ती या खेपेला भाजपकडे असतील. यामुळे विधानसभेच्या ३० जागा जिंकण्याचे स्वप्न साकार होणार आहे. 

महामार्ग अन्यत्र नेता येणार नाही' मुख्य़मंत्री प्रमोद सावंतांनी केलं...

पणजी, सांताक्रुझ, मडगाव, फातोर्डा, नावेली, मुरगाव, वास्को मतदार संघातून अल्पसंख्याक समाजाचे मतदार भाजपमध्ये प्रवेशासाठी आताही तयार आहेत. हे सरकार जनकल्याणासाठी आहे. १० हजारांहून अधिक सरकारी नोकऱ्या युवक युवतींसाठी ते उपलब्ध करत आहेत. आताच जाहिराती येण्यास सुरवात झाली आहे. कॉंग्रेसने आजवर अल्पसंख्याक समाजाचा वापर करून घेतला तर भाजपने दिलेला शब्द पाळण्यास सुरवात केली आहे. त्याचमुळे महमद इक्बाल यांना गोवा आर्थिक विकास महामंडळाचे संचालकपद लगेच दिले आहे.

संबंधित बातम्या