गोव्यातील शहरेही ’स्वयंपूर्ण’ करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यातील शहरेही ’स्वयंपूर्ण’ करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Copy of Gomantak Banner - 2021-02-10T215950.359.jpg

म्हापसा : आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना केवळ पंचायत क्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता नगरपालिका क्षेत्रातही राबवली जाईल. यामुळे उपनगर आणि शहरातील छोट्या व्यापार्‍यांना आणि लघू उद्योजकांना याचा लाभ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. म्हापसा येथील कदंब नवीन बसस्थानक प्रकल्प बांधकामाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी म्हापशाचे आमदार तथा जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष ज्योशुआ डिसोझा, म्हापशाचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा शहर हे राज्याचे मध्यवर्ती शहर असल्याचे सांगितले. बार्देश तालुक्याचे मुख्यालय असून या शहराला उत्तर गोव्याचे प्रवेशद्वार असेही संबोधले जाते. येथील बाजारपेठ, मार्केट यार्ड पोतुगिजकालीन आहे. म्हापसा शहरात पायाभूत सुविधा आणि विकासकामे करण्यास सरकार कटिबद्ध आहे. नवीन बस स्थानक प्रकल्प भव्य-दिव्य असेल. याठिकाणी सर्व घटकांना प्राथमिक सुविधा दिल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हापसा येथील कदंब बसस्थानकाचा मोठा प्रकल्प 14 वर्षे रेंगाळत पडला होता. माजी आमदार तथा उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी या प्रकल्पासाठी खूप प्रयत्न केले. तसेच हा प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आग्रही होते. स्व. डिसोझा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील बसस्थानक प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज बुधवारी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला सुरुवात होत आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आंतरराज्य प्रवाशांसाठी शेड, कादंब महामंडळाचे कार्यालय, वाहक आणि चालक यांच्यासाठी विश्रामगृह, कॅन्टीन, प्रसाधनगृह, 11 टेम्पो, 15 बस, 44 चारचाकी, 64 दुचाकी आणि 15 रिक्षांची क्षमता असलेले पार्किंग स्टॅन्ड, हायमास्ट स्टॅन्ड तसेच मार्केट यार्डमध्ये जाण्यासाठी सात मीटरच्या रस्त्याची सोय करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम सहा महिन्यात पूर्ण होईल. आणि नागरिकांसाठी पावसाळ्यापूर्वी खुला केला जाईल, असे आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com