मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच सरकारची वाटचाल - प्रमोद सावंत 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

स्व. मनोहर पर्रीकर हे माझे राजकीय गुरू. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच सरकारची पुढची पावले टाकत गोव्याचा विकास केला जात आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज काढले.

स्व. मनोहर पर्रीकर हे माझे राजकीय गुरू. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच सरकारची पुढची पावले टाकत गोव्याचा विकास केला जात आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज काढले. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भाजपच्या पणजीतील कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी अंत्योदय तत्त्वावर हे सरकार चालत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  याशिवाय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते, आणि ते पूर्ण करणे हे आपल्या सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. 

तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला दिशा दाखवली असल्याचे म्हणत, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या बळावरच आजवर सरकारची वाटचाल झाली असल्याचे डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यामुळे सरकारच्या यशात त्यांचे अमूल्य योगदान हे कधीही विसरता न येणारे असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि पणजी महापालिका निवडणुकीतील भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी स्व. पर्रीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी मिरामार येथील मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली वाहिली होती.

नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल 

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथील स्मारकाचे काम येत्या पाच-सहा महिन्यात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मिरामार येथे दिली. पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी आयोजित करण्यात आलेल्या आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. मनोहर पर्रीकर यांनी पायाभूत सुविधांचा विकास गोव्यात केला. खासकरून, गोवा मुक्तीनंतर पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास त्यांच्या कारकिर्दीत झाल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले. सरकारने त्यांच्या विचारांचे कार्य पुढे नेताना आता मनुष्यबळ विकासावर भर दिलेला असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले. आणि मनोहर पर्रीकर हे आज आपल्यात नसल्याची पोकळी सदोदित जाणवत राहणार आहे, मात्र त्यांचे विचार आपल्या सोबत असून त्या विचारांच्या आधारे सरकारचे काम पुढे नेले जात असल्याचे प्रमोद सावंत यांनी पुढे म्हटले.       

मिरामार येथील मनोहर पर्रीकर यांच्या स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या