मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गणेशभक्तांची माफी मागावी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

लोकांना दोष देणारे मुख्यमंत्री व भाजपचे पदाधिकारी संपूर्ण देशात टाळेबंदीच्या काळात आभासी मिरवणूक व उत्सव साजरे करण्यात मग्न होते, त्यामुळेच कोविड महामारीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास ते अपयशी ठरले असून त्याचा दोष लोकांना देऊ नये.

पणजी: गणेशचतुर्थी उत्सवामध्ये सहभागी होऊन कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावण्यास गणेशभक्त जबाबदार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य करून गोव्याच्या सर्वात अपयशी व अकार्यक्षम मुख्यमंत्र्यानी राज्यातील गणेशभक्तांच्या भावना दुखविल्या आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसकाचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. 

लोकांना दोष देणारे मुख्यमंत्री व भाजपचे पदाधिकारी संपूर्ण देशात टाळेबंदीच्या काळात आभासी मिरवणूक व उत्सव साजरे करण्यात मग्न होते, त्यामुळेच कोविड महामारीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास ते अपयशी ठरले असून त्याचा दोष लोकांना देऊ नये. टाळेबंदीच्या काळात सामान्य माणूस जीवनावश्यक वस्तू शोधत फिरत असताना, भाजप सरकारचे मंत्री व कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करण्यात मग्न होते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सामाजिक चाचणी करण्याचा सल्ला देत होते त्यावेळी हेच मुख्यमंत्री सामाजिक सर्वेक्षण करण्याच्या हट्टाला पेटले होते. अर्थव्यवस्था कोसळल्याने हवालदिल झालेला सामान्य व्यापारी मदतीची याचना करीत असताना भाजप सरकार जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्याची तयारी करीत होते, अशी टीका त्यांनी केली.

गोव्यातील गरीब वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती जेव्हा जवळ जवळ सहा महिने आर्थिक सहाय्याची वाट पाहत होते, तेव्हा मुख्यमंत्री सावंत हे कोट्यवधी खर्च करून नवे राजभवन, विधानसभा संकुलाचे नुतनीकरण तसेच पर्रिकरांचे थडगे बांधून, प्रकल्पांच्या खर्चावर कमिशन लाटण्याचे स्वप्न पाहत होते. आज कोविड हाताळणीत पूर्णपणे अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व भाजप सरकारला लोकांना दोष देण्याचा कोणताच अधिकार नसून, गोव्याते कोविड डेस्टिनेशन करण्यास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

अखेर काँग्रेसमध्ये हिंदुत्व जागले!
कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना सामाजिक अंतर व तोंडाला मास्क वापरण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भर दिला होता. त्यामुळे त्यांनी माफी मागण्यासारखेच ते काहीच बोलले नाहीत. श्रीराम प्रभूंच्या विरोधात असलेले काँग्रेस नेते गणेशभक्त बनले. काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्यात हिंदुत्व आहे याबाबत आनंद आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवीत होते ते आता जागे झाले आहेत. काँग्रेस धार्मिक भावनांचा राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न करत आहे ही शरमेची बाब आहे त्यामुळे त्यांचाच पर्दाफाश झाला आहे. कोविड महामारीमध्ये सर्व धर्माच्या लोकांनी कोणताही उत्सव किंवा सण साजरा करताना सामाजिक अंतर व तोंडाला मास्क लावण्याचे महत्त्व आहे, असे भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या