जीवरक्षकांच्या आमरण उपोषणाला यश

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या (जीएचआरडीसी) माध्यमातून आंदोलन करणाऱ्या जीवरक्षकांना सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्‍वासन दिले.

पणजी: सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी गेली वर्षभर आंदोलन केल्यानंतर मागील डिसेंबरच्या सुरुवातीपासून जीवरक्षकांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. काल सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या (जीएचआरडीसी) माध्यमातून आंदोलन करणाऱ्या जीवरक्षकांना सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे गोवा ट्रेड युनियन कॉन्फड्रेशनच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा आज ॲड. अजितसिंग राणे यांनी केली. 

आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकासमोर जमलेल्या जीवरक्षकांनी आज संघटनेच्या एकतेच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी ॲड. राणे, स्वाती केरकर यांची उपस्थिती होती. ॲड. राणे म्हणाले की, जीवरक्षकांच्या हक्कासाठी गोवा ट्रेड युनियने गेली वर्षभर वेळोवेळी आंदोलन केले. राज्य सरकारला अनेकदा निवेदने दिली. आम्ही सनदशीर, लोकशाही आणि सत्याग्रह मार्गाने आंदोलन केले. अनेक महिन्यांपासून आंदोलनला यश येत नसल्याने नोव्हेंबर २७ तारखेला आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण सुरू केल्यानंतर आम्हाला क्रांती मुक्तीदिनी म्हापशाला हलविण्यात आले. आम्ही त्यास अजिबात विरोध न करता म्हापशातही आंदोलन सुरू ठेवले. 

ॲड. राणे म्हणाले की, मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी सायंकाळी बंगल्यावर आम्हाला बोलावून घेतले. त्यावेळी जीवरक्षकांच्या समस्या आपणास माहीत असून, आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात जीएचआरडीसीच्या माध्यमातून सर्व जीवरक्षकांना सेवेत सामावून घेतले जाईल, कोणत्याही जीवरक्षकावर अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे, त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करीत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड पक्ष, आम आदमी पक्ष, शिवसेना यांच्यासह इतर बिगरसरकारी संघटनांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानत असल्याचे ॲड. राणे म्हणाले. 
गोवा ट्रेड युनियनने आत्तापर्यंत वीज खात्याचे कर्मचारी, गोवा रिक्रुरमेंट ॲण्ड एम्प्लायमेंट, साबांखा कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे, दिव्यांग शिक्षक अशांना न्याय मिळवून दिले आहे. या आंदोलनाच्या यशात माध्यमांचेही यश असल्याचे ॲड. राणे यांनी नमूद केले. दरम्यान, केरकर यांनी सांगितले की, जीवरक्षक संघटनेच्यामाध्यमातून हे आंदोलन सुरू झाले, त्याला यश आल्याचे दिसत आहे. जोपर्यंत सर्व जीवरक्षकांना सेवेत सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.

आणखी वाचा:

कोरोनाच्या नियमांचा भंग करत पर्यटकांचा अमर्याद जल्लोष - 

संबंधित बातम्या