खाण प्रश्‍न सोडवण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यशस्वी होतील

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

साखळी भाजप मंडळाला विश्वास, आरोप निरर्थक 

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खुद्‌द खाण भागातील असल्याने त्यांना खाणबंदीमुळे खाणपट्‌टा भागातील जनतेसह खाण अवलंबितांवर ओढवलेलेल्या संकटाची पूर्णपणे जाण आहे. त्यामुळेच खाण प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत आग्रही असून, त्यांचे त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी खाण व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. असा दावा साखळी भाजप मंडळाने साखळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. खाणी सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चालविलेल्या प्रयत्नांना नक्‍कीच यश मिळणार. असा विश्वास साखळी भाजप मंडळाचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी करुन खाण प्रश्‍नावरुन ट्रक मालकांनी मुख्यमंत्र्यांना नाहक ''टार्गेट'' करु नये. असा सल्ला दिला आहे. भाजप कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी मंडळाचे सरचिटणीस कालीदास गावस आणि संजय नाईक उपस्थित होते. खाण प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने खाणींचा प्रश्‍न नक्‍की निकालात कधी येईल. ते सांगता येत नाही. तरीदेखील अन्य पर्यायांचा विचार करीत मुख्यमंत्र्यांनी खनिज ई-लिलावाचा मार्ग शोधला. त्यामुळेच खाण अवलंबित ट्रक मालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. असेही श्री. सुर्लकर यांनी म्हटले आहे. 

विविध योजना!
खाणी बंद झाल्यापासून खाण अवलंबितांना विशेष करुन ट्रकमालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेजसह वन टाईम सेटलमेंट आदी योजना सुरु केल्या. असे असतानाही ट्रक मालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना नाहक लक्ष्य करण्यात येत आहे. असे श्री. सुर्लकर यांनी व्यक्‍त करुन सरकारच्या योजनांचा ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:बरोबर अन्य ट्रकमालकांना फायदा मिळवून दिला आहे की नाही, त्याचे अगोदर निरीक्षण करावे. असा सल्ला दिला. खाण प्रश्‍न हा केवळ साखळीपुरताच मर्यादित नसून, तो संपूर्ण राज्याचा प्रश्‍न आहे. असे श्री. सुर्लकर यांनी सांगून हा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्री नक्‍कीच यशस्वी होतील. असा विश्वासही व्यक्‍त केला.

संबंधित बातम्या