चिखली उपजिल्हा इस्पितळ समस्यांच्या गर्तेत

वार्ताहर
रविवार, 13 सप्टेंबर 2020

साधनसुविधांचा अभाव; ३० कोटी खर्चून १२० खाटांची सोय

दाबोळी:चिखली येथील उपजिल्हा इस्पितळाचे उद्‌घाटन होऊन दीड ते दोन वर्षे झाली. मात्र, कर्मचारीवर्ग तसेच तज्ञ डॉक्टर व इतर साधनसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. याविषयी सरकारने त्वरित लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चून १२० खाटांचे अत्याधुनिक पद्धतीचे चिखली इस्पितळ सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या इस्पितळात साधनसुविधांचा अभाव भासत आहे. 

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील जनतेसाठी चिखलीतील उपजिल्हा इस्पितळ बांधले आहे. या इस्पितळात रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली होती, पण उद्‌घाटन होऊन दीड वर्ष झाले तरी या इस्पितळात सोयीसुविधांची कमतरता भासत आहे. आवश्यक मनुष्यबळ नियुक्त न केल्याने विविध समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते.

चिखली येथील इस्पितळाचा पन्नास वर्षांचा इतिहास असून तालुक्यातील हे एकमेव सरकारी इस्पितळ आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ ते या तालुक्यातील जनतेची सेवा करीत आलेले आहे. पन्नास वर्षानंतर हे भव्य स्वरूपात इस्पितळ उभे राहिले आहे. तालुक्याची लोकसंख्या फार कमी होती, तेव्हा १९६८ साली चिखलीच्या कुटीर रुग्णालयाची स्थापना झाली होती. मुरगाव तालुक्यातील हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे. मोठ्या संख्येने लोक या रुग्णालयाचा लाभ घेत असतात. मात्र, तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि अनेकप्रकारच्या सुविधांअभावी या रुग्णालयाच्या जागी मोठे इस्पितळ उभारून रुग्णालयाचा दर्जा वाढविण्याची मागणी मागच्या जवळपास पंधरा वर्षांपासून अधिक काळ होत होती. या मागणीची दखल अखेर सरकारने घेत चिखलीतील कुटीर रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन १८ फेब्रुवारी २०१५ रोजी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वी कुटीर रुग्णालय ६० खाटांचे होते, मग मुरगाव तालुक्यातील लोकांना चांगली उपचाराची सेवा मिळावी या उद्देशाने येथे १२० अत्याधुनिक इस्पितळ उभारण्याचा मनोदय बाळगून ही इमारत उभी केली. चिखली कुटीर रुग्णालयाची ११ हजार चौ. मी. जागा असून ६ हजार २०० चौरस मीटर एवढ्या जागेत ही इमारत बांधण्यात आली. या जागेत पूर्वी निवासी इमारती होत्या. त्या पाडून सदर इस्पितळ दोन मजली उभारण्यात आले आहे. 

या इस्पितळाच्या उद्‌घाटनापूर्वी आधी म्हणजे सहा महिन्यापूर्वीच या भव्य स्वरूपातील इस्पितळ प्रकल्पाने आकार घेतला होता. हॉस्पिटल बांधून सज्ज झाले तरी नोकरभरती व यंत्रसामग्रीअभावी हे हॉस्पिटल एवढ्यात खुले करण्याचे आरोग्य खात्याने टाळले होते. मग २५ जानेवारी २०१९ रोजी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मंत्री मिलिंद नाईक, आमदार दीपक प्रभू, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार एलिना साल्ढाणा यांच्या उपस्थितीत इस्पितळाचे उद्‌घाटन झाले. मात्र, अद्यापही या नवीन इस्पितळामध्ये आवश्यक नवीन यंत्रसामग्री उपलब्ध झालेली नाही. तसेच आवश्यक नोकरभरती ही झालेली नाही.

दरम्यान, या उपजिल्हा इस्पितळात वाहन पार्किंग व्यवस्था भेडसावत असून येथे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना आपले वाहन इस्पितळाच्या मुख्य गेटच्या बाहेरील रस्त्यावर पार्क करावे लागते. पूर्वीचे कुटीर रुग्णालय पाडून त्या जागी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येणार म्हणून सांगितले होते. 

मात्र, तो प्रस्ताव अजून लालफितीत आहे. या जागेत ८० चारचाकी व दोन रुग्णवाहिका ठेवण्याची क्षमता असेल. हा प्रकल्प झाला तर वाहन पार्किंगची समस्या आपोआप सुटेल.

सध्या या इस्पितळात १३ बाह्यरुग्ण विभागांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसाधारण बाह्यरुग्ण विभागासह सर्जरी, मेडिसिन, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, दंतचिकित्सा, कान-नाक-घसा, प्रसूती, रेडिओलॉजी, बालरोग वगैरे विभागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लसीकरण, ड्रेसिंग, प्लास्टर रूम, उपचार रूम, सिटीस्कॅन, क्ष - किरण यंत्र, अल्ट्रासोनोग्राफी, प्रयोगशाळा, समुपदेशक या सुविधांची योजना असली, तरी यातील सुविधांचा अजून अभाव आहे. त्यातच तज्ज्ञ डॉक्टरांचीही कमतरता भासत आहे.

संबंधित बातम्या