नानोड्यात चिरेखाणीत बुडून बालकाचा दुर्दैवी अंत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील कुटुंबियांतील दहाहून अधिकजणांचा एक गट तीन मोटारगाड्या घेऊन पावसाळी पर्यटनासाठी नानोडा येथे आला होता. अरीफ आपल्या आई-वडिलांसोबत पर्यटनासाठी आला होता. आई-वडिल आणि नातलगांसमक्षच ही हृदयद्रावक घटना घडली.

डिचोली: कुटुंबियांसमवेत डिचोलीतील नानोडा येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या एका दहा वर्षीय बालकाचा  चिरेखाणीत बुडून मृत्यू होण्याची घटना आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. क्रूर काळाने झडप घातलेल्या बालकाचे नाव अरीफ पंचम्हालदार असे असून तो ओर्डावाडा-कळंगुट येथील होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील कुटुंबियांतील दहाहून अधिकजणांचा एक गट तीन मोटारगाड्या घेऊन पावसाळी पर्यटनासाठी नानोडा येथे आला होता. अरीफ आपल्या आई-वडिलांसोबत पर्यटनासाठी आला होता. आई-वडिल आणि नातलगांसमक्षच ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे घटनास्थळी आकांत पडला होता. घटनास्थळी जमलेले स्थानिकही हळहळ व्यक्त करीत होते. 

दुपारपर्यंत पावसाळी पर्यटनाची मजा लुटल्यानंतर गटातील सगळेजण नानोडा येथील एका फार्मपासून काही अंतरावरील बंदावस्थेतील चिरेखाणीजवळ जेवणाचा आस्वाद घेत होते. यावेळी अरीफ जवळच असलेल्या चिरेखाणीजवळ गेला. काही कळायच्या आत तो घसरून पाण्यात पडला आणि क्षणात नाहीसा झाला. अलीकडेच पडलेल्या जोरदार पावसामुळे चिरेखाण पाण्याने तुडूंब भरली होती. चिरेखाणी सभोवताली फेन्सिंग वा प्रतिबंधात्मक कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे जवान विशाल कळंगुटकर यांनी चिरेखाणीत उडी घेऊन अरीफ याचा मृतदेह बाहेर काढला. डिचोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या