चिनी पर्यटकांचे येणे लांबणीवर

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

पर्यटन खात्याचा प्रस्तावित ‘रोड शो’ही रद्द

पणजी

युरोप, रशियातील पर्यटकांपाठोपाठ चीनमधून पर्यटक आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांवर पाणी पडल्यातच जमा झाले आहे. सुरुवातीला कोविड टाळेबंदीमुळे चिनी पर्यटक व्यावसायिकांचे शिष्टमंडळ गोव्यात येणे लांबणीवर पडले होते, आता केंद्र सरकारने चीनविरोधी भूमिका घेतल्याने पर्यटन खात्याचे चीनमधील प्रस्तावित रोड शोही रद्द झाल्यातच जमा आहे.
याबाबत फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, चीनमधून पर्यटक आणण्यासाठी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर चीनमध्ये जाणार होते. आता केंद्र सरकारची भूमिका आणि कोविड महामारी यामुळे ते चीनला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये या प्रस्तावित चीन दौऱ्यासाठी केलेल्या तरतुदीचा काही उपयोग नाही. यामुळे अर्थसंकल्पाची फेरमांडणी करावी लागणार आहे.
चीनमधून आपल्या देशात पूर्वी प्रवासी येत, आता चिनी पर्यटक, आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमध्ये आढळतात. त्यांना गोव्याकडे आकृष्ट करण्यासाठी गोवा सरकारने चीनमध्ये रोड शो करण्याची योजना तयार करण्यात आली होती. पर्यटन खात्याच्या या योजनेला राज्य सरकारनेही मंजुरी दिली होती आणि त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली होती.
चीनमधून येणाऱ्या शिष्टमंडळात छायाचित्रकार, मॉडेल्स, ऑनलाईन आणि ऑफलाईन आरक्षणे करणारे, विपणन तज्ज्ञ यांचा समावेश होता. मात्र कोविड महामारीच्या उद्रेकामुळे चीनच्या या शिष्टमंडळाने आपला गोवा दौरा लांबणीवर टाकला. दिवाळीच्या दरम्यान हे शिष्टमंडळ येईल असे नियोजन करण्यात येत होते. त्यानंतर गोव्याच्या शिष्टमंडळाचा चीनमधील काही प्रमुख शहरात रोड शो करण्यासाठी दौरा होणार होता. याचदरम्यान गलवान प्रकरण घडले आणि चीनसोबतचे आपल्या देशाचे संबंध बिघडले. यामुळे चीनच्या शिष्टमंडळाचा दौरा आणि गोव्याच्या शिष्टमंडळाचा चीन दौरा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. त्यामुळे तूर्त चिनी पर्यटक गोव्यात दिसणार नाहीत यावर शिक्कामोर्तबच झाल्यात जमा आहे.

संबंधित बातम्या