चोगम भरती: वीज कनिष्‍ठ अभियंत्‍यांची बढती रखडली : १९८३ पासून फरफट सुरूच

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

राज्यात १९८३ मध्ये चोगम (राष्ट्रकुल राष्ट्र प्रमुखांची परिषद) झाली. त्यानिमित्त वीज खात्याने त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर बढती केली होती.

पणजी:  राज्यात १९८३ मध्ये चोगम (राष्ट्रकुल राष्ट्र प्रमुखांची परिषद) झाली. त्यानिमित्त वीज खात्याने त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर बढती केली होती. त्या अभियंत्यांच्या बढतीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इतक्या वर्षांनी ही समस्या पुढे उद्‍भवेल यांची कल्पनाही कोणी केली नसेल.

कनिष्ठ अभियंत्यांना पुढे सहाय्‍यक अभियंता, अशी बढती दिली जाते. कनिष्ठ अभियंतापदी पदवी व पदविकाधारक अशा दोन्ही पद्धतीच्या उमेदवारांना संधी असते. 

त्यांच्यात या पातळीवर भेदभाव नसतो आणि ज्येष्ठता यादीही समान असते. चोगमच्यावेळी पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर करायचा होता. त्यासाठी संघप्रदेश असलेल्या गोव्याच्या वीज खात्याने कनिष्ठ अभियंता मोठ्या प्रमाणावर  (४९ जण) त्यावेळी नियुक्त केले. त्यावेळी पदवीधारक उमेदवार नसल्याने पदविकाधारकांना संधी मिळाली. त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांची संख्या १०० वर पोहोचली होती. त्यापैकी केवळ तिघा जणांकडेच पदवी पात्रता होती.

पदविकाधारकाने सात वर्षांची तर पदवीधारकाने तीन वर्षांची सेवा बजावल्यानंतर तो सहायक अभियंता या पदावर बढती मिळण्यासाठी पात्र ठरतो. या बढतीसाठी पदविका व पदवीधारकांसाठी वेगळे नियम (जसे सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा खात्यात आहेत) नाहीत. त्यामुळे सेवा ज्येष्ठता यादीनुसार सहाय्‍यक अभियंतापदी बढती देण्यात येऊ लागली. यामुळे २००७ पर्यंत सहाय्‍यक अभियंतापदावरील सर्वजण पदविकाधारक होते. 

भरती नियमातील फोलपणा नडला
कनिष्ठा अभियंतापदी १९८३ च्या मोठ्या भरतीनंतर पदवीधारक कनिष्ठ अभियंता त्याच पदावर अडकले. नीलकांत रेड्डी, एस. लेक्षमनन यांचा यात अपवाद होता. याशिवाय अन्य खात्यातून प्रतिनियुक्तीवर आलेले लक्ष्मीकांत कोलवेकर व खेडेकर यांचाही त्यात समावेश होता. भरती नियमांतील फोलपणामुळे पदविकाधारक सहाय्‍यक अभियंत्यांची बढती रखडल्याचा मुद्दा पदवीधारक अभियंता संघटनेने २००० साली सरकारच्या लक्षात आणून दिला होता. वीज खात्याकडे २००६ पासून कार्यकारी अभियंतापद भरण्यासाठी पदवीधारक सहाय्‍यक अभियंताच नाहीत, ही बाबही सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, हा प्रश्न आणखी गहन होत गेला त्याची आणखी वेगळी कहाणी आहे.

(क्रमशः) 

संबंधित बातम्या