चोर्ला घाटमार्ग वाहतुकीस धोकादायक; धुक्याचाही वाहनचालकांना धोका; रस्ता दुरुस्तीची गरज

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सत्तरी तालुक्यातून केरीमार्गे कर्नाटक राज्याशी जोडला जाणाऱ्या चोर्ला घाटात सध्या अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे. त्यामुळे ‘चोर्ला घाट नव्हे, मृत्यूचा घाट’ असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

वाळपई: सत्तरी तालुक्यातून केरीमार्गे कर्नाटक राज्याशी जोडला जाणाऱ्या चोर्ला घाटात सध्या अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे. त्यामुळे ‘चोर्ला घाट नव्हे, मृत्यूचा घाट’ असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. केरी वाहन तपासणी केंद्रापासून चोर्ला घाटाला सुरवात होते. सुमारे अठरा किलोमीटर रस्ता चोर्ला घाटात मिळतो. या अठरा किलोमीटरच्या मार्गातून जाताना वाहनचालकांना मात्र नाकेनऊ येते. चोर्ला घाटात सध्या खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच ठिकाणी वळणावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालवायचे कसे असा मोठा यक्ष प्रश्न वाहनचालकांना पडलेला आहे. 

चोर्ला घाट हा वळणा वळणांचा आहे. या घाटातून वाहनांची ये जा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. अनमोड घाट बंद झाल्यापासून सर्वांनी चोर्लातून जाणे पसंत केले आहे.  या घाटात वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर आहे. या अडचणीमुळे दुचाकी, लहान चारचाकी चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. खड्डेमय रस्त्याबरोबरच रस्त्यालगतची जंगली झाडे काही ठिकाणी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचेही प्रकार झाले आहेत. यंदाही ऑगस्ट महिन्यात दरडी कोसळल्या होत्या. 

चोर्ला घाटाच्या माथ्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून घाट बंद होता. त्यावेळी युध्दपातळीवर यंत्रणा कामाला लागून दरडीची माती हटविली होती, पण तो भाग आजही धोक्याच्या स्थितीत आहे. त्यासाठी यंत्रणा जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. आता त्यातच खड्डेमय रस्ते हे जीवघेणेच ठरण्याची शक्यता आहे. या घाटात धोकादायक वळणे आहेत व याच ठिकाणी खड्डयांची मालिका बघावयास मिळते आहे. मोठ्या प्रवासी गाड्यांना यातूनच जावे लागते. अशावेळी प्रवासी गाडीतील प्रवाशांचे कंबरडे मोडले नाही म्हणजे झाले. या घाटाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ पावले शासनाने उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात हा घाट पूर्णपणे खड्ड्यांचा घाट म्हणून ओळखला जाणार आहे. म्हणूनच सरकारने हा घाटमार्ग तातडीने दुरुस्तीसाठी घेण्याची जरूरी आहे. 

सत्तरी बरोबरच अन्य तालुक्यातील लोकांसाठी हा एकमेव घाट आहे. हा घाट आणखीनच खराब होण्याअगोदर रस्त्याचे काम हाती घेतले पाहिजे. आता तर पावसाळा संपलेला आहे. त्यासाठी आता लवकरच या कामाची श्रीगणेशा होणे आवश्यक आहे. सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन प्रत्यक्षात काम हाती घेतले पाहिजे. नाहीतर हे खड्डे वाढतच जाणार आहेत.  वेळीच कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. घाटात आवश्यक ठिकाणी सिमेंटच्या संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता बनलेली आहे. त्यातून चोर्ला घाटाचा अशा कामातून चेहरा बदलण्याची जरूरी आहे. कारण चोर्ला घाटाला अनेकजण पसंती देत या मार्गाचा अवलंब करीत आहेत.  

रस्ता रूंद करण्याची गरज
चोर्ला घाटातील रस्ता सध्या वाढत्या वाहनांमुळे वळणे रूंद करण्याची गरज आहे. कारण वाढत्या वाहनांच्या विचार केल्यास घाटात बदल करणे गरज बनलेली आहे. सरकारने या चोर्ला घाटाकडे अतिआवश्यक नजरेने पाहून सुधारणा करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलण्याची जरुरी आहे. प्रवासाचे सर्व निर्बंध उठविल्यानंतर सध्या चोर्ला घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू झालेली आहे. भविष्यात नागरिकांना समस्यांना तोंड देण्याआधीच पूर्ण घाटमार्गाचे कामे हाती घेतले पाहिजे व मुबलक रस्ता प्राप्त होईल यासाठी सरकारने कामाची रचना करणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या