चोर्लाघाट रस्ता दुरुस्ती की धूळफेक ?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

  गेल्या दोन वर्षापासून खराब झालेला चोर्लाघाट रस्ता यंदा कोविड काळातही दुरुस्त केलाच नाही. शिवाय अवजड वाहनांना बंदी असूनही प्रचंड वाहतूक या रस्त्याने केली गेली, त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला.

खांडोळा  :   गेल्या दोन वर्षापासून खराब झालेला रस्ता यंदा कोविड काळातही दुरुस्त केलाच नाही. शिवाय अवजड वाहनांना बंदी असूनही प्रचंड वाहतूक या रस्त्याने केली गेली, त्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला. १७ कि. मीटर रस्ता खड्यात गेला आहे. खड्ड्यातून रस्ता शोधत घाटमार्गातून पुढे जावे लागते. ९ कोटी रुपयांचे खर्चाचे कंत्राट इंटरबिल्ड कंपनीला देऊनही कामाला गती नाही. रस्ता दुरुस्तीच्या नावावर फक्त जनतेच्या डोळ्यात ‘धूळफेक’ चालली आहे, याला निद्रिस्त शासन जबाबदार आहे, असे मत वाहनचालकासह प्रवाशांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

इंटरबिल्ड कंपनीतर्फे महिनाभर काम सुरू असून एक किलोमीटर रस्ता सुद्धा खड्डेमुक्त करण्यात आलेली नाही. इतक्या मंदगतीने काम सुरू आहे. काही ठिकाणी खडी टाकलेली दिसते. आठवड्यातून एखाद्या दिवशी चार-पाच माणसे तेथे रस्त्यांच्या बाजूला काही तरी काम करताना दिसतात. एका बाजूला रोडरोलर ठेवलेला आहे, दुसऱ्या बाजूला डांबर गरम करण्यासाठीचे यंत्र आहे. दोन-तीन डांबराचे डबे आहेत. इतक्या कमी साहित्यात हा रस्ता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी व वाहनचालकांना पडलेला आहे.
गेल्या महिन्यात अनेक वेळा या रस्त्यासंदर्भात प्रसारमाध्यमातून पडसाद उमटले. तेव्हा खूप गाजावाजा करून रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली होती. परंतु कामाला गती मिळाली नाही. शिवाय अनेक वेळा राज्यातील इतर कामासाठी येथील काम बंद ठेवण्यात आले. १७ कि. मीटरसाठी अवघे चार-पाच कर्मचारी येथे कामाला ठेवले जातात. अधिकारी उपलब्ध नसतात. त्यामुळे काम पुढे सरकत नाही. रोज नवे नवे खड्डे निर्माण होत आहे, याला रस्ता दुरुस्ती करणाऱ्या इंटरबिल्ड कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधखातेही जबाबदार आहे, असे मत सुर्ल येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले.

कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याबद्दल विचारले, तर गेला महिनाभर एकच उत्तर देतात, काम सुरू आहे. परंतु  गेल्या महिनाभरात काही कर्मचाऱ्यांनी फोंड्याला काम केले, काहींनी दिवस जुने गोवेत काम केले.  त्यामुळे काम रखडले.  यासंदर्भात अधिकारी नेहमीच आजपासून, उद्यापासून, पुढील आठवड्यापासून काम सुरू करणार अशी आश्वासने देतात. कालसुद्धा कंत्राटदार कंपनीचा एक अधिकारी म्हणाला, काम सुरूच आहे. पण प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीला गती आलेली नाही. एकूणच या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्याकडून पाहणीही केली जात नाही. हा प्रकार असाच चालला तर येत्या काही दिवसात पूर्ण रस्ता बंद होईल. त्यामुळे गोव्यात येणारा भाजीपाला व इतर साहित्य येणेही बंद होणार आहे. त्यामुळे वाढणारी महागाई, आवश्यक साहित्याची टंचाई यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण होणार आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचा वाळपई विभागाने या रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कंत्राट दिल्यानंतर ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते. त्यासाठी संबंधितांनी लक्ष द्यायला हवे. मुदतीत न झाल्यास वाढणारा खर्च शेवटी जनतेच्या खिशातूनच जातो. त्यासाठी संबंधितांना त्वरित या रस्ता कामाला गती द्यावी, अशीही प्रवाशांची मागणी आहे. रस्त्यासंबंधी काम करणारे अधिकारी सुटीवर असल्यामुळे कनिष्ठ अधिकारीही कामाकडे दुर्लभ करीत आहेत, याकडेही लक्ष देणे गरजे आहे. १७ कि.मीटर रस्ता दुरुस्तीसाठी दीड महिना उलटला असून अद्याप एक किलोमीटर रस्ताही दुरुस्त झाला नाही. याला संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे, हे सिद्ध होते.

मुख्यमंत्र्यांनी पाहणी करावी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्री. पाऊसकर यांनी रस्त्यांची पाहणी करावी. अवघ्या १७ किलोमीटर रस्त्यांची झालेली अवस्था पाहावी, मृतवत रस्ता पाहावा, म्हणजे त्वरित कामाला सुरुवात होईल, असेही मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. कर्नाटक शासन ८० किलोमीटर रस्त्यांची योग्य काळजी घेते, तर अवघ्या १७ कि.मि. रस्त्यांकडे गोवा सरकार का दुर्लक्ष करते, याबद्दलही अनेकांना आश्चर्य व्यक्त केले.

अवजड वाहतूक नको
चोर्लाघाटात रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. तरीसुद्धा मोठ्या संख्येने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे दररोज नवे नवे खड्डे पडत आहेत. अंजुणे धरण परिसरात काही खड्डे बुजवले होते. तेथेही या वाहनांमुळे पुन्हा रस्ता खराब झाला असून मोठ्या प्रमाणात रस्ता उखडलेला आहे. तेव्हा रस्ता दुरुस्ती काळात अवजड वाहतुकीवर निर्बंध घालायला हवेत, अशी प्रवाशांची मागणी आहे

संबंधित बातम्या