गोव्यातील धार्मिक स्थळांमधील गर्दी बघून तुम्हीही म्हणाल... 'गोवा इज ऑन'...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

गोव्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही पर्यटकांची, भाविकांची गर्दी बघून लवकरच सारं काही पूर्ववत होईल अशी आशा येथील व्यावसायिकांमध्ये दिसत आहे.  

पणजी- फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जग कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र, इटली आणि इराण येथील भयावह परिस्थिती बघता भारतात मार्चमध्ये सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यात नेहमीच गर्दीचा वावर असणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्थळांना पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मार्चमध्ये मंदिरे तसेच इतर प्रार्थना स्थळांनाही बंदी घालण्यात आली. आठ महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर आता ही स्थळे पुन्हा अनलॉक करण्यात आली आहेत. प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर आता भाविकांना आणि श्रद्धाळूंना आपापल्या श्रद्धास्थानांना भेट देता येणे शक्य होत आहे. 

महाराष्ट्रातील मंदिरांप्रमाणेच गोव्यातील चर्च अत्यंत प्रसिद्ध आहेत. केवळ गोव्यातीलच नाहीत तर थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून भाविक या चर्च मध्ये प्रार्थना करण्यासाठी येत असतात. यावेळीही अनेक महिने वाट पहावी लागल्यनंतर ओल्ड गोवा येथील जगप्रसिद्ध से कॅथेड्रल आणि बॅसिलिका ऑफ बोम जीजस या दोन चर्चमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटकांनी भेट देण्यासाठी अक्षरश: गर्दी केली. या दोन्ही धार्मिक स्मारकांचे ख्रिस्ती धर्मियांमध्ये आत्यंतिक महत्व असून येथे फक्त ख्रिस्ती धर्मीयच नव्हे तर अन्य धर्मियांचीही कायमच रीघ लागलेली असते. 

लॉकडाउनच्या काळात सबंध देश कुलूप बंद असल्याने बराच काळ नागरिकांना कुठेच जाता आले नाही. गोव्यातही हीच परिस्थिती उद्भवल्याने एरवी फक्त पर्यटकांच्या गर्दीसाठीच ओळखले जाणारे गोवा राज्य याकाळात ओसाड पडले होते. मात्र, आता हळूहळू गोव्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही पर्यटकांची, भाविकांची गर्दी बघून लवकरच सारं काही पूर्ववत होईल अशी आशा येथील व्यावसायिकांमध्ये दिसत आहे.  

संबंधित बातम्या