चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित सुदेवा दिल्लीवर दोन गोलनी मात; आय-लीगमध्ये अपराजित

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड राखताना सोमवारी विजयाची नोंद केली. त्यांनी सुदेवा दिल्ली एफसीवर 2-0 फरकाने मात केली.

पणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड राखताना सोमवारी विजयाची नोंद केली. त्यांनी सुदेवा दिल्ली एफसीवर 2-0 फरकाने मात केली.

सामना कोलकाता येथे झाला. सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. स्लोव्हानियाचा 31 वर्षीय खेळाडू लुका मॅसेन याने 19व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. त्याने हा गोल क्लेव्हिन झुनिगाच्या असिस्टवर नोंदविला. त्यानंतर मॅसेन याच्या असिस्टवर 21 वर्षीय ब्रायस मिरांडा याने दुसरा गोल केला. मॅसेन सामन्याचा मानकरी ठरला.

चर्चिल ब्रदर्सचा हा चार सामन्यातील तिसरा विजय ठरला. अन्य एका बरोबरीसह त्यांचे सर्वाधिक 10 गुण झाले आहेत. सुदेवा एफसीला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले आहेत. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना शुक्रवारी (ता. 29) टिड्डिम रोड एथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाविरुद्ध होईल.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेन याचे स्पर्धेत 3 गोल

- चर्चिल ब्रदर्सचे 4 लढतीत 8 गोल

- चर्चिल ब्रदर्सच्या स्पर्धेत 3 क्लीन शीट्स

- सुदेवा एफसीवर प्रतिस्पर्ध्यांचे 4 गोल

संबंधित बातम्या