Cyclone Tauktae Impact: वादळानंतर गोव्यात आला समस्यांचा महापूर'

Cyclone Tauktae Impact: वादळानंतर गोव्यात आला समस्यांचा महापूर'
Citizens in Goa are facing major difficulties after the storm

पणजी: राज्याला गेल्या दोन दिवसांत बसलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone)  तडाख्यामुळे दैनंदिन जीवन अजूनही विस्कळीत झाले आहे. राज्यातील बहुतांश गावातील नागरिकांवर (Citizens) अजूनही अंधारातच राहण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर, वीजवाहिन्यांवर झाडे तसेच विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी वीज खात्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे (Electricity Cut off) लोकांचे बरेच हाल होत आहेत. वीज उपकरणांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने राज्यातील वीजप्रवाह पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असले तरी झालेली नुकसानी पाहता आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (Citizens in Goa are facing major difficulties after the Cyclone Tauktae)

राज्यातील बहुतेक भागात तसेच सांताक्रूझ, पर्वरी व ताळगावच्या काही परिसरात आज संध्याकाळपर्यंत वीजप्रवाह सुरू झाला नसल्याने लोकांवर काळोखातच तिसरी रात्र काढण्याची पाळी आली आहे. नादुरुस्त झालेले विद्युतवाहक तसेच फिडर व मोठ्या प्रमाणात तुटलेल्या वीजवाहन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी वीज खात्याकडे असलेल्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. अजूनही काही भागामध्ये तुटलेल्या वीजवाहन्या रस्त्यावर पडलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील वीज अधिकारी व कर्मचारी हा वीजप्रवाह सुरू करण्यास शर्थीचे प्रयत्न करत असले तरी त्यांच्या कामाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे शेजारील राज्यातून मोडलेल्या विजेच्या खांबांच्या जागी नवे विजेचे खांब उभे करण्यासाठी मजूर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

वीजप्रवाह खंडित झाल्याने लोकांना पिण्याच्या पाण्याचे बरेच हाल झाले. घरातील फ्रीज बंद राहिल्याने आतील वस्तू खराब झाल्या. काही लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या वीस लिटरच्या मोठ्या बाटल्या तसेच एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी सकाळपासून दुकानांवर गर्दी केली होती. दुपारपर्यंत अनेक दुकानांवरील पाण्याच्या बाटल्या संपल्या होत्या. काही पेट्रोल पंपही वीज नसल्याने बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना इंधन भरणे शक्य झाले नाही. अनेक कुटुंबातील लोकांनी ‘टेक अवे’ हॉटेलच्या बाहेर खाद्यपदार्थांची तसेच जेवणाची पार्सले नेण्यास गर्दी केली होती. 

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर झाडाच्या फांद्या मोडून पडल्या होत्या. त्या बाजूला करून रस्त्याच्या कडेलाच टाकण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या बाजूने असलेल्या माडाची झावळेही मोठ्या प्रमाणात पडली होती. तसेच पालापाचोळ्याचा खच रस्त्यावर होता. वीज खात्याकडील वाहनांच्या कमतरतेमुळे एकाचवेळी कर्मचाऱ्यांना वीजवाहन्या जोडण्याचे काम करताना मुश्कीलीचे होत होते. मोठ्या प्रमाणात विद्युतवाहक व फिडर निकामी झाल्याने त्याच्या बदल्यात पर्यायी उपकरणेही उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना वीज खात्याला सामोरे जावे लागले आहे.
                                                               

पंतप्रधानांकडून नुकसानीचा आढावा
राज्यात वादळामुळे झालेली हानी भरून काढण्‍यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी केंद्र सरकार आपत्ती निवारणात राज्य सरकारसोबत असून लागेल ती मदत या कठीण समयी उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.  

घरात पावसाचे पाणी तुडुंब; प्यायला थेंबही नाही..!
वीजप्रवाह बंद झाल्याने अनेकांना घरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. वादळी वाऱ्यासह काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी घुसले. घरातील पावसाचे पाणी बाहेर टाकण्यात येत असल्याचे अनेक ठिकाणचे चित्र होते. आज सकाळपासून काही भागातील इमारतीतील लोकांनी जवळपास असलेल्या विहिरींवर पाण्यासाठी गर्दी केली होती. घरातील इतर वापरासाठी या विहिरीचे पाणी बादल्यांनी नेण्यात येत होते. काही लोकांनी जवळपास वीज असलेल्या नातेवाईकांकडे धाव घेतली आहे. यापूर्वी पावसाळ्यातही अशाप्रकारची स्थिती कधी ओढवली नव्हती.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com