मुरगाव नगरपालिकेच्या वास्‍कोतील उद्यानांची दुर्दशा

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

पालिकेकडून दुर्लक्ष : झुडपे, चारा वाढल्‍याने स्‍थानिकांकडून नाराजी

दाबोळी: मुरगाव नगरपालिकेच्या वास्को शहरातील दोन्ही उद्यानाची दुर्दशा झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेतर्फे उद्यानाची योग्य प्रकारे निगा राखणे होत नसल्याने येथे येणाऱ्या बालगोपाळ, जेष्ठा बरोबर नागरिकांना रोगराई होऊ शकते.

वास्को स्वतंत्र पथ मार्गावर मुरगाव नगरपालिकेची असलेली दोन्ही उद्याने फक्त शोभेपुरती राहिली आहेत. या उद्यानात एक बालोद्यान असून येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप कमी साहित्य आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले साहित्य साफसफाई नसल्याने साहित्याची खूपच दुर्दशा झालेली आहे. यामुळे लहान मुले जर येथे खेळण्यासाठी गेल्यास त्यांना दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. बालोद्यान जेव्हा पालक मुलांना घेऊन येतात तेव्हा येथे सुरक्षारक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात पालिकेचा एकही सुरक्षारक्षक तेथे बालोद्यानात यावेळी नसतो. याच मार्गावर ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर सामान्य नागरिकांना सुद्धा आणखी उद्यान असून तेथे सुरक्षारक्षक कधीच नसतो. यामुळे या उद्यानातील फुलांच्या झाडावरील फुले दिवसा-रात्री नागरिक काढत असतात. यासाठी येथे सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.

मुरगाव नगरपालिकेच्या दोन्ही उद्यानात कामगार योग्य प्रमाणे काम करीत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी बरोबर रानटी झाडे व चारा वाढलेला आहे. दोन्ही उद्यानात खूपच कामगारांची कमतरता असल्याने तसेच कामगार काम करीत नसल्याने, पालिकेच्या मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी हा विषय गंभीरतेने घेऊन येथे जाऊन पाहणी करून घ्यावी. तसेच पालिकेच्या दोन्ही उद्यानातील पर्यवेक्षकाला आदेश देऊन या उद्यानातील सर्व जबाबदारी घेण्याचा आदेश द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या