मांद्रेबाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी उद्यापर्यंत गावात यावे

पत्रक
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

मांद्रेवासीय जे राज्यात इतर ठिकाणी राहतात, त्यांना मांद्रे गावात गणेशचतुर्थीसाठी यायचे असल्यास त्यांनी मंगळवार १८ ऑगस्टपर्यंत गावात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांद्रे ग्रामपंचायत आणि कोविड - १९ टास्क फोर्स समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच सेराफिना फर्नांडिस यांनी दिली आहे.

मांद्रे

गणेशचतुर्थीच्या तोंडावर लोकांनी कोणती काळजी घ्यावी, आपल्या परिसरात कोणाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास कोणती दक्षता घ्यावी, यासंबंधीही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. गणेशचतुर्थीनिमित्त लोकांनी खरेदीसाठी बाजारात व दुकानांमध्ये गर्दी करू नये, सामाजिक अंतर राखावे, मास्क तोंडाला बांधून फिरावे, दुकानदारांनीही गर्दी होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. सामान खरेदीसाठी घरातील एकच व्यक्ती दुकानात जावी जेणेकरून गर्दी होणार नाही आणि धोकाही कमी होईल. गणेश मूर्ती विसर्जनासाठी पंचायत सदस्यांनी आपापल्या प्रभागात मदत करावी, त्यादृष्टीने नियोजन करावे, असे ठरवण्यात आले.
या बैठकीला अॅड. प्रसाद शहापूरकर, डॉ. जोसेफ फर्नांडिस, शंकर गोवेकर, सुजय म्हामल, पंचायत सदस्य प्रदीप हडफडकर, महादेव हरमलकर, उपसरपंच आम्रोस फर्नांडिस, माजी सरपंच महेश कोनाडकर, माजी पंच दुमिंग फर्नांडिस आदी उपस्थित होते.
गावातील लोकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने दक्षता बाळगावी आणि उत्सव चांगल्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सरपंच सेराफिना फर्नांडिस यांनी केले आहे.

संबंधित बातम्या