‘प्लाझ्मा’ दानासाठी नागरिकांनी पुढे यावे

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांचे आवाहन

दाबोळी: ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी नागरिकांनी घाबरू नये. ‘प्लाझ्मा’ दानामुळे एखाद्याला जीवदान मिळत असल्याने अधिकाअधिक नागरिकांनी ‘प्लाझ्मा’ दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी केले आहे. ‘प्लाझ्मा’ घेण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीची पडताळणी करण्यासाठी बायणा रवींद्र भवनमध्ये खास शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

सचिन देसाई पुढे म्हणाले, की मुरगाव तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात कोविडबाधित मिळाले होते. परंतु त्यापैकी बरेचजण उपचाराअंती बरे झाले आहेत. पोलिस विभाग, मामलेदार कार्यालय, आरोग्य विभाग, मुरगाव पालिका व इतर सरकारी कार्यालयातील काहीजण कोविडमुक्त झाले होते. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्याकडून प्लाझ्मा घेण्यापूर्वी त्यांची अँटीबॉडी चाचणी करण्याचे काम सुरू झाले आहे. इतरही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येतील अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली. आम्ही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आलो आहोत. आमची अँटीबॉडी टेस्ट झाल्यावर आमच्याकडून प्लाझ्मा घेण्याची कार्यवाही होईल. आम्ही इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावेत यासाठी जागृती करणार असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. अँटीबॉडी चाचणीसाठी गोमेकॉ डॉक्टरांचे पथक होते.

कोविडबाधित झाल्यानंतर उपचाराअंती बरे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्लाझ्मा दान इच्छुकांनी तेथे येऊन आपली अँटीबॉडी चाचणी करून घेतली. कर्मचाऱ्यांची संख्या पाहून उपजिल्हाधिकारी देसाई यांनी समाधान व्यक्त केले. कोविडमुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपण होऊन पुढे येत जपलेल्या सामाजिक जाणीवेचे त्यांनी कौतुक केले. इतर सरकारी कर्मचाऱ्यांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

संबंधित बातम्या