म्हापसा शहराला ग्रासलेय अनेकविध समस्यांनी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

म्हापसा शहरात अनेकविध समस्या प्रकर्षाने जाणवतात. शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली वाताहात, वाहतूक व्यवस्था, पे-पार्किंगचा प्रश्न, बसस्थानकावरील अस्वच्छता, मार्केट सबयार्डमधील नियमबाह्य कृती, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था अशा कित्येक समस्या सध्या दीर्घ काळापासून म्हापसा शहरवासीयांना भेडसावत आहेत.

म्हापसा : म्हापसा शहरात अनेकविध समस्या प्रकर्षाने जाणवतात. शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली वाताहात, वाहतूक व्यवस्था, पे-पार्किंगचा प्रश्न, बसस्थानकावरील अस्वच्छता, मार्केट सबयार्डमधील नियमबाह्य कृती, सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था अशा कित्येक समस्या सध्या दीर्घ काळापासून म्हापसा शहरवासीयांना भेडसावत आहेत.

 

म्हापसा शहरातील मुख्य रस्त्यांची स्थिती सध्या थोडीफार चांगली असली तरी बहुतांश अंतर्गत रस्त्यांची वाताहात झालेली आहे. त्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. अंतर्गत रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी कित्येक कार्मक्रमांत बोलताना म्हापसावासीयांना दिले होते. तथापि, त्यानंतर कोविडचे व त्यानंतर पावसाळ्याचे कारण पुढे करून ती कामे पूर्ण होऊच शकले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी त्यानंतर दिले.

 

म्हापसा शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तर तीन-तेरा वाजलेले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मनमानेल पद्धतीने वाहनांचे पार्किंग केले जात असले तरी त्याबाबत कारवाई करण्यात वाहतूक पोलिस टाळाटाळ करीत असतात. अगदी मोक्याच्या ठिकाणी ‘नो पार्किंग’च्या क्षेत्रात वाहने पार्क केली जात असली तरी त्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांना त्यासंदर्भात फोनवरून कळवले तरी त्याबाबत कारवाई करून आर्थिक दंड ठोठावण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हापसावासीयांचे म्हणणे आहे. 

 

पे-पार्किंगच्या बाबतीत कंत्राटदाराची अनागोंदी चालल्याचे दिसून येते. त्याबाबत म्हापसा पालिका प्रशासनाचा वचक नसल्याने त्या कंत्राटदाराचे आयतेच फावते. कंत्राटदाराचे कर्मचारी दमदाटी करून वाहनचालकांकडून प्रमाणाबाहेर शुल्क आकारत असल्याचे प्रत्ययास येते. बसस्थानकावरील अस्वच्छता तर नित्याचीच झालेली आहे. या स्थानकावर सर्वत्र गलिच्छ वातावरण असते. तिथे सर्वत्र बियरच्या तसेच दारूच्या बाटल्या महिनोन्‍महिने पडलेल्या दृष्टीस पडतात. तसेच, खासगी बसेसचे चालक व वाहक दुपारच्या वेळेत भोजन केल्यानंतर बाकी राहिलेले खाद्यजिन्नस बसस्थानकावरच टाकून देत असतात. त्यामुळे, तो परिसर नेहमीच विद्रूपावस्थेत 
असतो.

 

मार्केट सबयार्डमध्ये तर अस्वच्छता, अतिक्रमणे इत्यादी नियमबाह्य कृती सातत्याने सुरू असतात. तेथील अनागोंदी कारभारावर गोवा कृषी पणन मंडळाची मुळीच देखरेख नसते. त्यामुळे तेथील परिसर ओंगळवाणा बनलेला आहे.
म्हापसा बाजारपेठेतील बहुतांश सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झालेली आहे. त्या शौचालयांची यथायोग्य निगा राखली जात नसल्याने लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, सूरज बूक स्टॉलच्या समोर उभारण्यात आलेल्या मुतारीत तर पाणीच उपलब्ध नसल्याने तिथे नेहमीच दुर्गंधी असते. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच फायदा झालेला नाही.

 

अधिक वाचा :

 

गोव्यात २ वर्षांपासून दिव्यांग हक्क आयोगाला आयुक्त नाहीच 

वर्षभरात ‘एसीबी’कडे गोव्यातील ३८० प्रकरणे दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे गोवा सरकारच्या नोकरभरती प्रक्रियेला दणका

 

संबंधित बातम्या