खर्च केलेले लाखो रुपये वाया: होंड्यातील नागरीक सुविधा केंद्र बंद

खर्च केलेले लाखो रुपये वाया: होंड्यातील नागरीक सुविधा केंद्र बंद
Civic amenity center closed in Honda

पिसुर्ले : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा येथील बसस्थानकावर स्‍थानिकांच्‍या सोयीसाठी सुरू केलेले नागरीक सुविधा केंद्र टाळेबंदी शिथिल केली, तरी बंदच आहे. सरकारी कार्यालये सुरळीत चालू झाली, तरी हे कार्यालय अद्याप कुलूप बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.
भाजप सरकारने जनतेला दिलासा देताना सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली प्राप्त करून देण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुमारे दोन वर्षांपूर्वी ठिकठिकाणी नागरीक सुविधा केंद्र उघडण्यात आली होती. त्यात पर्ये मतदार संघात येणाऱ्या पंचायत क्षेत्रातील जनतेला सोयीस्कर व्हावे,

यासाठी मध्यवर्ती अशा होंडा बसस्थानकावर हे केंद्र सुरू करण्यात आले होते. यासाठी सरकारच्या महसूल खात्याने कदंब महामंडळाच्या कार्यालयात लाखो रुपये खर्च करून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना जातीचा, रहिवासी, उत्पन्न यासह विविध प्रकारचे दाखले येथे कागदपत्रे सादर केल्यानंतर सहजरीत्या उपलब्ध होत होते. त्यामुळे सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक करून या केंद्राला मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देऊन आपली कामे करून घेत होते. परंतु कोरोना महामारीच्‍या प्रादुर्भावामुळे गेल्या सात आठ महिन्यांपूर्वी हे केंद्र बंद करण्यात आले होते. 


मात्र, कोरोना महामारीचा प्रसार कमी झाल्यामुळे सरकारने राज्यातील सर्व व्यवहार तसेच अस्थापने, सरकारी कार्यालये सुरळीत सुरू केली, तरी अद्याप नागरिकांना दिलासा ठरणारे हे महत्त्वाचे असे नागरीक सुविधा केंद्र बंदच ठेवण्यात आल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. 
या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल हे केंद्र लवकर सुरू करावे, अशी मागणी होंडा भागातील सामाजिक कार्यकर्ते भिमराव राणे यांनी केली आहे. होंडा बसस्थानकावर या 
केंद्रामुळे नागरिकांची वर्दळ वाढलेली दिसत होती, परंतु हे केंद्र बंद असल्याने हा परीसर भटके कुत्रे व गुरांचा आश्रय बनलेला दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com