गोवा माईल्‍स - टुरिस्‍ट टॅक्‍सीवाल्‍यांमध्ये ‘राडा’ ; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

गोवा माईल्स आणि स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक यांच्‍यात रविवारी पुन्‍हा एकदा वाद झाला.

शिवोली : गोवा माईल्स आणि स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक यांच्‍यात काल पुन्‍हा एकदा वाद झाला. दुपारी हणजूण - कायसूव येथे गोवा माईल्सचा चालक क्लॉयडन क्लाईव्ह फर्नांडिस (फातोर्डा-मडगाव) आणि स्थानिक टॅक्सी चालकात भाडे नेण्यावरून  वाद निर्माण झाला व प्रकरण हातघाईवर आले. या घटनेनंतर मारहाण झालेल्या गोवा माईल्सच्या टॅक्सी चालकाने स्थानिक टॅक्सी चालकांविरोधात हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी दोघा टुरिस्ट टॅक्सी चालकांना ताब्यात घेतले. त्‍यानंतर टुरिस्ट टॅक्सी चालकांनी हणजूण पोलिस स्थानकाच्या आवारात जमा होत घटनेचा निषेध केला.  

वादाचे कारण...

उपलब्ध माहितीनुसार, रविवारी सकाळी गोवा माईल्सचा चालक क्लॉयडन फर्नांडिस हा दाबोळी विमानतळावरून देशी पर्यटकांना कळंगुट -बागा येथील एका खासगी हॉटेलमध्‍ये पोहोचविण्यासाठी आला होता. या दरम्यान, हणजूण येथील एका हॉटेलमधून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी पर्यटकांना घेण्यासाठी गोवा माईल्सचा चालक आला असता तेथील टॅक्सी चालकांनी त्याला अडवले. यावेळी क्लॉयडन फर्नांडिस आणि स्थानिक टॅक्सी चालकांत भाडे नेण्यावरून वाद निर्माण झाला आणि प्रकरण हातघाईवर आले. या घटनेत क्लॉयडन याला स्थानिक टॅक्सी चालकांकडून जबर जबर मारहाण करण्यात आली. 

 पोलिसांत तक्रार नोंद

क्‍लॉयडन याच्‍या तक्रारीची दखल घेत हणजूण पोलिसांनी कारवाई करताना गोवा माईल्सचे चालक क्लॉयडन याची शिवोली येथील स्थानिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. तसेच मारहाण झालेल्या जागेची पाहाणी केली असता तेथे उपस्थित असलेल्या व मारहाण प्रकरणात सहभागी असलेले दोघे संशयित मंगलदास जना पालयेकर (दाबोलकरवाडा- शापोरा), रोहन रत्नाकर गवंडी (देऊळवाडा- पार्से) यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून टॅक्सी चालकांवर अन्याय झाल्याचे टॅक्सी चालकांनी पोलिसांविरोधात आरोप केला आहे. कायदा हाती घेणाऱ्यांची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे हणजूण पोलिस निरीक्षण सूरज गावस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या