क्लॉड आल्वारिस यांनी दिशाभूल करू नये: मंत्री काब्राल

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आल्वारिस हे वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. तसेच चुकीची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवू नये. त्यांनी लोकांची माफी मागायला हवी.

पणजी: केरी आणि बाणावली किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी जो कोळसा आढळला, त्याविषयी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दिला आहे. त्या अहवालात हा कोळसा वजनाने हलका (लोणार कोळसा) असून, तत्काळ अतिउष्ण होणारा आहे. त्यामुळे गोवा फाऊंडेशनचे क्लॉड अल्वारिस यांनी केलेले आरोप धांदात खोटे असल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट होत आहेत.

किनाऱ्यावरील कोळशाविषयी रासायनिक अभ्यास समिती दोन-तीन दिवसांत अभ्यास करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
काब्राल म्हणाले की, आल्वारिस हे वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. तसेच चुकीची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवू नये. त्यांनी लोकांची माफी मागायला हवी. यापूर्वी त्यांनी खाणींबाबत चुकीची माहिती पोहोचविली आहे.

रासायनिक तज्ञ समितीच्या अहवालानंतर आपण मुख्यमंत्र्यांकडे चुकीची माहिती दिल्याबद्दल पावले उचलण्याविषयी फाईल देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सागरमाला प्रकल्पाबाबत ज्या जेटी उभारल्या जाणार आहेत, त्याविषयी अपप्रचार केला जात आहे. या जेटी पूर्णतः लोकांच्या प्रवाशासाठी वापरल्या जाणार आहेत. किनाऱ्यावर जो कोळसा वाहून आला आहे, तो कसा आला याचाही शोध घेतला जाणार आहे. ते पुढे म्हणाले की, कोळसा हाताळणी योग्य पद्धतीने कोठेतरी झाली असावी, त्यामुळे तो किनाऱ्यावर वाहून आला. आपणासही कोळसा नको आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही कोळसा नको, असे सांगितले आहे. परंतु जी यापूर्वी कोळसा वाहतूक होत आहे, ती कोळसा वाहतूक सुरूच राहणार आहे.

वाल्मिकी यांच्याशी चर्चेस तयार!
आम आदमी पक्षाने आपणास विजेच्या विषयावर चर्चेचे आव्हान दिले होते. आपण ते आव्हान स्वीकारले असून, ईडीसीच्या इमारतीत बुधवारी सायंकाळी ४ वाजता आपचे नेते वाल्मिकी नाईक यांच्याशी चर्चा होईल. या चर्चेसाठी केवळ माध्यमप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती मंत्री काब्राल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या