स्‍पष्‍ट बहुमत, तरीही आलबेल नाही!

political game
political game

पणजी :

सत्ताधारी भाजपकडे विधानसभेत स्पष्ट बहुमत असले, तरी सारेकाही आलबेल नसल्याची माहिती हाती येऊ लागली आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या दहा आमदारांपैकी एका आमदाराच्या घरी बैठक घेत, अपात्र ठरलो तर पुढील सहा वर्षे काय? अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे अन्य एका महत्त्वाकांक्षी नेत्याने संभाव्य उमेदवारांची जमवाजमव हाती घेतली आहे.
गोवा फॉरवर्डचे शिवोलीतील आमदार विनोद पालयेकर आणि साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून भाजपमध्येच अस्वस्थता आहे. या दोन्ही आमदारांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे अनेकवेळा सांगितले आहे. तरीही भाजपमधील काही नेत्यांना आपले श्रेष्ठी अशक्य ते शक्य करून दाखवतील, असे वाटत आहे. त्यामुळे भाजप आमदारांनाच यापुढे मंत्रिपदे असे म्हणणारा एक गट आकाराला आला आहे. त्या गटाने अद्याप जाहीर वक्तव्य केले नसले, तरी आपापसांत बोलताना ते बाहेरून आमदार आणून त्यांना मंत्रिपदे देणे कधी बंद होणार, अशी विचारणा ते करू लागले आहेत.


‘त्‍या’ नेत्‍याला वेध ‘कप्‍तान’पदाचे!
या साऱ्या वातावरणात एका महत्त्‍वाकांक्षी नेत्याने संघटनेचे पक्षात रुपांतर केल्यानंतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. चार- पाच मतदारसंघात आपल्याला मर्यादित ठेवणारा हा नेता आपला परिघ विस्तारू पाहत आहे. भविष्यात कप्तानपद मिळवायचे असेल दिमतीला ८-९ आमदार असावेत, असे नियोजन तो सध्या करत आहे. गरज भासली तर आपण स्वतःही भाजप पक्ष त्यागून आपल्याच पक्षाच्या निशाणीवर लढण्याचा त्याचा मनसुबा आहे. यासाठी साळ परिसरातील एका जाणकाराचे व्यवस्थित मार्गदर्शन घेतले गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.


मणिपूर निकालामुळे धाकधूक वाढली!
 मणिपूरमधील राजकीय स्थितीवर दिलेल्या निकालाप्रमाणे गोव्यातही काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर पुढे काय, याविषयावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी दहा फुटीर आमदारांपैकी एका आमदारांच्या घरी बैठकही झाली असून, त्यात बऱ्याच गोष्टींच्‍या पैलूतून पाहिल्‍याची माहिती पुढे आली आहे.
मणिपूरध्ये ज्याप्रमाणे फुटीर आमदारांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली, त्याप्रमाणे गोव्यातही दहा आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षीय पातळीवर या आमदारांना दिलासा दिला जात असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या गोटात असलेल्या चेंडूवर यांची विकेट पडू शकते, हे मात्र राजकीय विश्‍लेषक ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दहा आमदारांपैकी तिसवाडीतील एका आमदाराच्या घरी एक बैठकही पार पडली, त्यात भाजपचे काही मोजके नेतेही उपस्थित राहिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मणिपूर राजकीय घडामोडींच्‍या पार्श्वभूमीवर जर त्‍या दहाही आमदारांना सहा वर्षे निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आलीच तर राजकीय शक्याशक्यता पडताळून पाहण्यात आल्या. काहीजणांची मते यावेळी जाणून घेण्यात आली असून, सभापती आपला निर्णय कळविला तरी ‘मणिपूर'प्रमाणे निकाल येऊ शकतो, याची भीती या दहाजणांच्या गोटात आहे. अनेकजण मनातून अस्वस्थ असले तरी ते भाव चेहऱ्यावर आणत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com