‘कसिनो’ खुले आणि वाचनालये बंद !

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

जिथे शांततेने, गर्दी टाळून वाचनाचा आनंद घेतला जातो, ज्ञानवृद्धी होते त्या मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यामागे सरकारचा कोणता हेतू आहे, असा प्रश्न वाचकांतून विचारला जात आहे. 

पणजी : ‘कोरोना’ महामारीमुळे सरकारने टाळेबंदी लादल्यानंतर गेले आठ महिने गोव्यातील सरकारी व इतर संस्थांच्या वाचनालयाचे दरवाजे बंद आहेत. त्यानंतर अनेक बाबतीत टाळेबंदीमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता आणण्यात आली. एवढेच नव्हे, तर देश विदेशातून मौजमजा व जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक पातळीवर विरोध असताना कसिनोचे दरवाजे या महिन्यापासून खुले करण्यात आले. असे असताना जिथे शांततेने, गर्दी टाळून वाचनाचा आनंद घेतला जातो, ज्ञानवृद्धी होते त्या मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यामागे सरकारचा कोणता हेतू आहे, असा प्रश्न वाचकांतून विचारला जात आहे. 

हतूक खुली करण्यात आली आहे. खासगी बसमध्ये लोक दाटीवाटीने प्रवास करताना पहायला मिळते. टप्याटप्प्याने उपहारगृहे, बार आणि रेस्टोरंट्स खुली झाली. एवढेच नव्हे तर ग्राहक नेहमीच खरेदीसाठी गर्दी करतात, ती मॉलही खुली करण्यात आली आहेत. 

समुद्रकिनारे देश-परदेशी पर्यटकांनी हळूहळू गजबजू लागले आहेत. आता तर कसिनोवर पुन्हा जत्रा भरणार आहे. म्हणजे जिथे हमखास गर्दी उसळते ती ठिकाणे खुली करताना सरकारला चिंता वाटली नाही. मग वाचनालयांचे दरवाजे खुले करण्यामागे कोणती अडचण वाटते, असा प्रश्न वाचक करत आहेत.

टाळेबंदी काळात वाचकांना वाचायला मुबलक वेळ आहे. निवृत्त लोक, वयोवृद्ध वाचनात बराचसा वेळ घालवायचे. त्यात मन रमवायचे. मात्र, वाचनालयांअभावी त्यांची गैरसोय होत आहे. 
विविध शाखेतील विद्यार्थी, संशोधन करणारे विद्यार्थी यांना वेळोवेळी नेमून दिलेले शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाचनालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यांना अन्य पर्याय नसतो. अशावेळी वाचनालये, संदर्भ ग्रंथालये बंद असल्याने त्यांची कुचंबणा होत असल्याचे वाचकांनी सांगितले.
बाजार, उपहारगृहे, बार आणि रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतूक, समुद्र किनारे आदी ठिकाणी आज सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला दिसत आहे. अनेकजण अनेकवेळा अशा ठिकाणी मुखावरणपण वापरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

या पार्श्वभूमीवर वाचनालयातील शांतता, शिस्त, गर्दी न करणे आदी गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जात असताना व मुखावरण न काढता वाचन करायला कोणतीच अडचण नसताना तसेच अनेक वाचक वाचनालयातील पुस्तके घरी नेवूनच वाचत असताना वाचनालये खुली करण्यास कोणतीच समस्या नसावी. तेव्हा आता वाचनालयाचे दरवाजे विनाविलंब खुले करून सरकारने वाचकांना दिलासा द्यावा, अशी वाचकांची मागणी आहे.
 

संबंधित बातम्या