राज्याच्या सीमा आधी बंद करा

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

फोंड्यात ट्रकचालकांमुळे भीती, ढाबे, फास्ट फूडमुळे धोका अधिक

फोंडा

राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या सीमा आधी बंद करा आणि बाहेरून कुणाला राज्यात प्रवेश देऊ नका, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. फोंड्यात गुजरातहून आलेल्या एका ट्रकचालकानंतर कुंडई तसेच इतर ठिकाणीही कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रेल्वेतून आलेल्यांमध्ये कोरोनाचे वाढत्या रुग्णांची संख्या धोकादायक ठरली असून, फोंड्यातील अनमोड-मोले मार्गावरून येणाऱ्या वाहनांना परत पाठवा अशी मागणी मोले तसेच इतर भागातील नागरिकांनी केली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्याने काही प्रमाणात खासगी बसगाड्या सुरू असल्यातरी ही संख्या कमी असून संध्याकाळी सातच्या आत घरात असा नियम असूनही फास्ट फूडवाले मात्र रात्री दहानंतर कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आतापर्यंत राज्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता. त्यामुळे गोव्याला ‘ग्रीन झोन’चा दर्जा देण्यात आला होता. मात्र आताची स्थिती वेगळी असून परराज्यातून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव गोव्यात झाला आहे. राज्याच्या सीमा आधी सील करा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या सीमांवर पोलिस तैनात असूनही घुसखोरी कशी काय होते, असा सवालही गोमंतकीयांकडून करण्यात येत आहे.
बेळगाव तसेच हुबळी कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात लोक गोव्यात शिरकाव करीत आहेत. वाहनांचे तांडेही वाढले आहेत. मोले भागात प्रवेश केल्यानंतर हे परराज्यातील नागरिक बिनधास्तपणे फिरत असल्याने स्थानिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मोले व इतर भागातील नागरिकांनी पंचायत मंडळासह धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आधी या लोकांना रोखा अशी मागणी केली आहे, पण अजून कार्यवाही झालेली नाही.
राज्याच्या इतर सीमा भागातूनही हाच प्रकार असून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात गोव्यात शिरल्यास हाहःकार माजण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आताच कडक निर्बंध लादण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रकचालकांमुळे भीती व्यक्त..!
राज्यात सध्या ट्रकचालकांमुळे स्थानिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा व कुंडई भागात परराज्यातील ट्रक व क्‍लिनरमुळे कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता प्रत्येक ट्रकचालक व क्‍लिनर तसेच इतरांची कसून चाचणी होण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यात खाण व्यवसाय जोरात सुरू असून ट्रकचालक हे बहुतांश परराज्यातील असल्याने कोरोनाचा फैलावही होण्याचा धोका वाढल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ढाबे, फास्टफूड धोकादायक
राज्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे चहा रेस्टॉरंट व बार रेस्टॉरंट सोडल्यास अन्य सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. फास्ट फूडवाले तर रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. फोंड्यातील महामार्गांवरील ढाबेही बिनधास्तपणे खुले केले जात असल्याने या धोका वाढला असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी यापूर्वीच हे ढाबे, फास्ट फूड त्वरित बंद करण्याची मागणीही केली आहे.

आताच काळजी घ्या, कडक निर्बंध लादा, आणि मुख्य म्हणजे सीमा सील करा. गोव्यात जेवढ्या प्रमाणात परराज्यातील लोक येतील, तेवढीच कोरोनाची प्रकरणे वाढणार आहेत, त्यामुळे योग्य कार्यवाहीची आज खरी गरज आहे.
- विराज सप्रे (फोंडा)

आता बेपर्वाई उपयोगाची नाही. एकदा हा आपल्या हातून निसटले तर मग काहीच शिल्लक राहणार नाही. आतापर्यंत गोवा ग्रीन झोनमध्ये होता, पण आता परराज्यातील नागरिकांच्या शिरकावामुळे गोव्याचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे सरकारने ढिले सोडता कामा नये.
- सुभाष नाईक (ढवळी - फोंडा)

संबंधित बातम्या