व्हाळशी प्राथमिक शाळेला "अच्छे दिन"
Closed school was reopened in Goa Dainik Gomantak

व्हाळशी प्राथमिक शाळेला "अच्छे दिन"

बंद पडलेली ही शाळा पुन्हा सुरु झाली

डिचोली: पटसंख्येअभावी राज्यातील (Goa) विविध भागात मराठी माध्यमाच्या (Marathi medium) सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. सरकारची (Government) अनास्था म्हणा, किंवा इंग्रजीचे फॅड म्हणा, एखादी शाळा बंद पडली, की ती पुन्हा सुरु करण्यासाठी नंतर मात्र कोणत्याच पातळीवर विशेष प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे काही भागात सरकारी शाळांची दूरवस्था झाली आहे. काही शाळांच्या इमारती तर अखेरच्या घटका मोजत आहेत. ही सरकारी शाळांची शोकांतिका असतानाच, डिचोली पालिका क्षेत्रातील व्हाळशी येथील सरकारी प्राथमिक शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी बंद पडलेल्या या शाळेचे मात्र अल्पावधितच भाग्य उजळले असून, या शाळेला पुन्हा "अच्छे दिन" आले आहेत. येथील 'दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान' या खाजगी संस्थेच्या पुढाकारातून बंद पडलेली ही शाळा पुन्हा सुरु झाली आहे.

शाळेचा इतिहास

डिचोली तालुक्यात ज्या मोजक्याच सरकारी प्राथमिक शाळा आघाडीवर आहेत. त्यात व्हाळशी शाळेचाही आवर्जून उल्लेख व्हायचा. सुरवातीपासूनच या शाळेकडे पालकांचा ओढा असायचा. शाळा बंद पडण्यापूर्वी दरवर्षी या शाळेतील पटसंख्या समाधानकारक असायची. या शाळेतून निवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका शीतल सायनेकर यांना शाळेतील शैक्षणिक आदी उपक्रमांमुळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. असा या शाळेचा लौकिक होता. मात्र 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता या शाळेत एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नाही. परिणामी पटसंख्येअभावी ही शाळा बंद करण्याची पाळी शिक्षण खात्यावर आली.

Closed school was reopened in Goa
Goa: मांगोरहिल भागातील 70 युवतींनी व 68 युवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

शाळा 'दीनदयाळ' च्या ताब्यात

व्हाळशी शाळा बंद पडताच सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानने पालकांच्या आग्रहास्तव प्राथमिक शाळा सुरु करण्याचा संकल्प करून बंदावस्थेतील व्हाळशी शाळेची इमारत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि जानेवारी 2020 साली शिक्षण खात्याने व्हाळशी शाळा इमारतीचा ताबा दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानकडे दिला. ही इमारत ताब्यात आल्यानंतर या इमारतीची आवश्यक रचनेनुसार दुरुस्ती करण्यात आली आहे. ' मागील शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण खात्याने दीनदयाळ विद्यामंदिराला इयत्ता पहिलीचा तर चालू शैक्षणिक वर्षांपासून दुसरीचा वर्ग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. मात्र 'कोविड' संकटामुळे मागीलवर्षीपासून वर्ग प्रत्यक्ष सुरु करणे शक्य झालेले नाही. महामारीच्या संकटामुळे शाळेत प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग सुरु झालेले नसले, तरी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. या शाळेत 32 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञान अर्थातच 'स्मार्ट' बोर्डच्या मदतीने ऑनलाईन शिकवणी करण्यात येत आहे. 'एसीजीएल' कंपनीने सीआरएस उपक्रमांतर्गत शाळेसाठी दोन स्मार्ट बोर्ड आदी मिळून 5 लाख रुपयांचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. 'नेस्ले' कंपनीने या शाळेसाठी स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे.

Closed school was reopened in Goa
Goa: राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत 'रितेश धाटकर' चमकला

'मॉडेल' शाळेचा संकल्प

संस्कारक्षम शिक्षण देतानाच कॉर्पोरेट संस्था आणि हितचिंतकांच्या सहकार्यातून 'दीनदयाळ विद्यामंदिर' ही एक 'मॉडेल' शाळा करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. आतापर्यंत जवळपास 16 लाख रुपये खर्चून इमारतीला नवा साज देण्यात आलेला आहे. एकदा काय शाळा प्रत्यक्ष सुरु झाली, की भविष्यात विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्याचा विचार आहे.

-प्रा. विठ्ठल वेर्णेकर, अध्यक्ष, दीनदयाळ विद्यामंदिर.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com