मुख्यमंत्र्यांच्या नाताळ शुभेच्छांची अशीही चर्चा

अवित बगळे
रविवार, 27 डिसेंबर 2020

येत्या सव्वा वर्षावर विधानसभा निवडणूक आल्याने प्रमुख अल्पसंख्याक समाज असलेल्या ख्रिस्ती समाजाशी जवळीक साधणे भाजप सरकारचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना भाग आहे.

पणजी

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजात स्थान निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केले आहेत. नाताळनिमित्त प्रदेशाध्यश्र सदानंद शेट तानावडे यांना सोबत घेत ख्रिस्ती आमदार, मंत्र्यांच्या घरी दिलेली भेट ही या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग होता.
ख्रिस्ती समाज हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपपासून फटकून वागत होता. पर्रीकर यांनी या समाजात भाजपविषयी विश्वास निर्माण केला. कॉंग्रेसपेक्षाही जास्त ख्रिस्ती आमदार भाजपच्या उमेदवारीवर निवडून येऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करूनही दाखवले होते. भले हिंदुत्वाच्या मुद्यावरून ख्रिस्ती समाज भाजपपासून चार हात दूर राहत असला तरी पर्रीकर यांच्याकडे पाहून भाजपच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करणारे बरेचजण होते. पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी लांबच्या लांब लागलेल्या रांगांत ख्रिस्ती समाजाची उपस्थिती पाहिली असती तर त्या समाजाशी पर्रीकर यांनी किती विश्वासाचे नाते निर्माण केले होते हे लक्षात येते.
विविध सामाजिक प्रश्नांवर चर्च कोणती भूमिका घेते त्यावर आधारीत मतदान होते हे ठरून गेलेले आहे. येत्या सव्वा वर्षावर विधानसभा निवडणूक आल्याने प्रमुख अल्पसंख्याक समाज असलेल्या ख्रिस्ती समाजाशी जवळीक साधणे भाजप सरकारचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना भाग आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी नाताळ सणाचे निमित्त साधत म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांचे निवासस्थान गाठले. त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. तेथून ते हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांच्या निवासस्थानी गेले. पर्रा येथे ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांच्या घरी जात त्यांना शुभेच्छा दिल्या. दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांच्या घरी जात मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तेथून त्यांनी नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा आणि जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्याशी मोबाईलवर संवाद साधत शुभेच्छा दिल्या. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्‍या.
गेल्या महिन्यात अल्पसंख्याक शाळांतील प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले होते. त्यामुळे प्रेरीत होऊन कॉंग्रेसचे तत्कालीन अल्पसंख्याक विभाग प्रदेश प्रमुख उर्फान मुल्ला यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये अनेक समर्थकांसह प्रवेश केला होता. मुख्‍यमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजात आपले नेतृत्व रुजावे यासाठी हे प्रयत्न सुरु केले असून त्यात त्यांना नेमके किती यश येते हे विधानसभा निवडणुकीत समजणार असले तरी राज्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत केवळ ख्रिस्ती आमदार, मंत्र्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेला प्रवास चर्चेचा ठरला आहे. 

संबंधित बातम्या