मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज मेळावली दौरा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आयआयटी` संदर्भात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत  गुरुवार २९ रोजी मेळावलीत येथील ग्रामस्थांचे व विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सकाळी नऊ वाजता येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

गुळेली:  `आयआयटी` संदर्भात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत  गुरुवार २९ रोजी मेळावलीत येथील ग्रामस्थांचे व विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सकाळी नऊ वाजता येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. गुरुवारी सकाळी मेळावली सत्तरी येथील जल्मी सातेरी देवस्थानच्या परिसरात येथील ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. ८ जुलै रोजी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीच्या वतीने जल्मी सातेरी देवस्थानच्या आवारात  गुळेली आयआयटी विरोधात आयोजित पत्रकार परिषद पोलिसांनी हस्तक्षेप करून उधळून लावली होती. तेव्हा पासून या आयआयटी विरोधात आंदोलन सुरू आहे.

या आंदोलकांनी यापूर्वीच सदर जागेवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या झाडांची कत्तल केली जाणार असल्याने वृक्षाबंधन, वृक्षरोपण आदी कार्यक्रम घेतले आहेत. 
तसेच संबंधित सर्व खात्यांना निवेदन सादर करून या भागातील लोकांचा या ठिकाणी हा आयआयटी प्रकल्प उभारण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.

शाम सांगोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गुळेली आयआयटी बचाव समितीची स्थापना करण्यात आली होती. परंतु त्या समितीच्या वतीने एक-दोन पत्रकार परिषद घेण्यापलीकडे आणखी काही काम केले नाही. आयआयटी समर्थनार्थ ही समिती वेगवेगळे उपक्रम राबवणार, असे समितीच्या वतीने जाहीर केले होते. गेल्या २३ सप्टेंबर रोजी मुरमुणे येथे नियोजित गुळेली आयआयटी जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जमलेल्या लोकांनी आजपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवले असून दररोज सकाळी मुरमुणे येथे धडा, मैंगीणे, शेळ, वाघे, पैकुळ, मुरमणे आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

संबंधित बातम्या