बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी..!; १ डिसेंबरपासून विविध खात्यांमधील नोकरभरतीला मुख्यमंत्र्यांची परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

सरकारी नोकरभरती कर्मचारी निवड आयोगामार्फत करण्याचे सरकारने ठरविले होते. मात्र, आयोगावर मोठ्या नोकरभरतीचा ताण येण्याची शक्यता असल्याने आयोगाची परवानगी घेऊन थेट खात्यांतर्गत नोकरभरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पणजी- गेल्या चार वर्षांपासून राज्यातील विविध खात्यात स्थगित असलेल्या नोकरभरतीवरील निर्बंध ३० नोव्हेंबरला उठणार आहेत. त्यामुळे पुढील काळात सुमारे १० हजार सरकारी नोकरभरती संबंधित खात्यांतर्गत विभांगामध्ये केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली.

सरकारी नोकरभरती कर्मचारी निवड आयोगामार्फत करण्याचे सरकारने ठरविले होते. मात्र, आयोगावर मोठ्या नोकरभरतीचा ताण येण्याची शक्यता असल्याने आयोगाची परवानगी घेऊन थेट खात्यांतर्गत नोकरभरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोकरभरती, विकास प्रकल्पांवरील निर्बंध ३० नोव्हेंबरला उठविले जाणार असल्याने त्यानंतर १ डिसेंबरपासून खात्यांवर कसलेच निर्बंध राहणार नाहीत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात नोकरभरतीसह नव्या विकासकामांवर निर्बंध लादण्यात आले होते. सर्व खात्याच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच त्याला मंजुरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 

गेल्या काही महिन्यांत राज्यात कोविड मार्गदर्शक सूचनांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर व्यवसायही सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारला महसूल मिळू लागला आहे. सध्या जी विकासकामे अडली आहेत त्याला गती देण्यासाठी हे निर्बंध उठवून संबंधित खात्याला असलेले अधिकार वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विविध खात्याच्या महसुलाचा आढावा वित्त खात्याकडून घेतला असता त्यात हळुहळू सुधारणा होत आहे. विविध सरकारी खात्यात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याची प्रक्रिया सुरू होऊन खात्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. सध्याच्या परिस्थितीत ही नोकरभरती कर्मचारी निवड आयोगामार्फत केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरण्यासाठीची प्रक्रिया अधिक किचकट होऊ शकते त्यामुळे खात्यांनाच त्या भरण्यास मुभा दिली जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

संबंधित बातम्या