लक्षणे दिसल्‍यास तत्‍काळ ‘कोविड’ चाचणी करा

मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात, मडगावचे ईएसआय इस्पितळ, फोंड्याचे उपजिल्हा इस्पितळ आणि मडगावच्या जिल्हा इस्पितळात कोविड उपचार मोफत केले जातात. त्यामुळे ‘कोविड’ची लागण झाल्यानंतर जनतेने घाबरून जाऊ नये.

पणजी: ‘कोविड - १९’चा संसर्ग झाल्‍यास, थोडीदेखील लक्षणे दिसल्यास तत्काळ कोविड चाचणी करून घ्यावी. लगेच उपचार सुरू झाले, तर कोविडमुक्त होण्यास वेळ लागत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे सांगितले.

सरकारसोबत कोविड विरोधातील लढ्यात जनतेचा सहभागही तेवढाच महत्त्‍वाचा आहे. जनतेने लक्षणे दिसल्यावर चाचणी करून घेणे, समाज अंतर पाळणे, मुखावरण वापरणे, सॅनिटायझर वापरणे आदी मार्गाने कोविड विरोधातील लढा सुरू ठेवला पाहिजे. ‘कोविड - १९’ विषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘कोविड’ची लागण झाल्यास उपचारासाठी कोविड निगा केंद्रात स्वतःला दाखल करून घ्यावे. या केंद्रांनी आजही खाटा रिक्त आहेत. कोविड इस्पितळ असो वा कोविड निगा केंद्र यात दाखल झालेल्यांची सरकारी यंत्रणा पूर्ण काळजी घेते. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात, मडगावचे ईएसआय इस्पितळ, फोंड्याचे उपजिल्हा इस्पितळ आणि मडगावच्या जिल्हा इस्पितळात कोविड उपचार मोफत केले जातात. त्यामुळे ‘कोविड’ची लागण झाल्यानंतर जनतेने घाबरून जाऊ नये.

प्राथमिक आरोग्‍य केंद्रात तपासणी सेवा उपलब्‍ध
सरकारला मृत्यू दर कमी करायचा आहे. २६ तरुण, ४५ वर्षीय व्यक्तीस मरण पावल्यानंतर इस्पितळात आणले गेले होते. असे करू नये. ताप, खोकला असल्यासही कोविड चाचणी करून घ्या, उपचार लवकर सुरू होणे हे गरजेचे आहे. कोविडची लक्षणे लपवणे हे महागात पडत आहे. उशिरा उपचारासाठी आलेल्यांवर उपचार करणे कठीण होते. त्यामुळे कोविडची लक्षणे दिसल्यावर चाचणी करून घेऊन सरकारला उपचार करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी सेवा उपलब्ध आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या