दक्षता सप्ताहाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या कानपिचक्या

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कामचुकार कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खातेप्रमुखच कार्यालयात १० ऐवजी १२ वाजता आले, तर शिपाई कामावरच येणार नाही, असे म्हटले आहे.

पणजी- सरकारच्या काही खात्यांत कर्मचारी कामावरच येत नाही, त्यांचे खातेप्रमुखही त्यांना याबाबत विचारणा करत नाहीत. काही ठिकाणी फाईल्स तशाच ठेवल्या जातात, त्याची माहितीही मला आहे, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे उघड केली. शिपायापासून लिपिकापर्यंत ते सरकारी कार्यालयात कामे घेऊन जाणाऱ्या जनतेकडे आपला संवाद आहे. त्यातूनच ही सर्व माहिती मिळाल्याचे आणि हवी तर ती उघड करण्याचीही आपली तयारी आहे, असे ते म्हणाले.सचिवालयात आज दक्षता सप्ताहाच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते.

याआधी त्यांनी गोवा आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमात कर्मचारीच महामंडळे तोट्यात जाण्यास कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यानंतर आज त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी लक्ष्य केले. खातेप्रमुखच कार्यालयात १० ऐवजी १२ वाजता आले, तर शिपाई कामावरच येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

कृपया भ्रमात राहू नका!
मुख्‍यमंत्री म्हणाले, खातेप्रमुखांना प्रशिक्षण देताना वेगवेगळे विषय मांडले गेले आहेत. सतर्क भारत, समृद्ध भारत, सतर्क गोवा आणि समृद्ध भारत ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. याचे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकारशाही महत्त्‍वाची आहे. राजकारणी धोरणे ठरवतात, पण अंमलबजावणी अधिकारी करतात. त्यांनी सतर्क असणे फार गरजेचे आहे. तरच राज्य समृद्ध होऊ शकते. कोविडोत्तर काळात महसूल गळतीकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच खर्च कपात केली गेली पाहिजे. त्याचा लाभ विविध प्रकारे सरकारला होणार आहे. लोकांना जनतेला कशी सेवा द्यायची हे खातेप्रमुखाने ठरवले पाहिजे. कार्यालयात काम करणारे कर्मचारी माझ्याशी बोलतात त्यातून बऱ्याच गोष्टी समजतात. फाईल का रेंगाळली हेही समजते. मला काही कळत नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. येथेच मी सारी माहिती देऊ शकतो. पण काही खातेप्रमुखांची कुचंबणा होईल म्हणून नाव घेऊन बोलत नाही.

‘आत्‍मनिर्भर भारत’ संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणा
आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जनतेला वेळेत सेवा दिल्या पाहिजे. दर शनिवारी २१० स्वयंपूर्णमित्र (अधिकारी, कर्मचारी) पंचायत पातळीवर जाणार आहेत. केवळ त्यांनीच गेले पाहिजे असे नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्याने ती आपली जबाबदारी मानली पाहिजे. सचिवांनीही गावात जावे. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिनशे नव्या जणांना गायीपालन, वराहपालन, कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसायात आणले आहे. असे काम झाले पाहिजे. राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांनी दक्षतेची शपथ सर्वांना दिली. मुख्यमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

 प्रत्‍येकाचे योगदान आवश्‍‍यक
हे राज्य, देश प्रगतीपथावर नेण्याची शपथ आम्ही आज घेतली आहे. कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने क्षमतेच्या ५० ते ७० टक्के योगदान दिले, तरी चित्र पालटू शकेल. लोकांना तत्पर सेवा देताना भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्यावरही भर दिला पाहिजे. ७०- ८० खात्यांची संकेतस्थळे बंद होती. खातेप्रमुखांनी कधी त्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर मुख्य सचिवांना सूचना करावी लागली. हे काम मुख्यमंत्री व मुख्य सचिवांचे खचितच नव्हे. राज्याचा अग्रक्रम कशाच्या आधारे ठरवले जाते. ते संकेतस्थळे पाहून ठरवतात. खात्यांनी आपल्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्या पाहिजेत. काही खाती मात्र अत्यंत चांगले काम करत आहेत. कारखाना व बाष्पक खात्यात कामासाठी १५ फेऱ्या का माराव्या लागतात. शंभर कर्मचारी काम करत असतानाही कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शंभर टक्के का होत नाही, असे ते म्‍हणाले.
 

संबंधित बातम्या