प्‍लाझ्मा दानासाठी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुढे यावे; मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

प्लाझ्मा दानाविषयी राज्यभरात जागृती करावी लागणार आहे. कोविड उपचार केंद्रात योग्य ते उपचार मिळतील आणि तेथे स्वच्छता राखली जाईल, किमान सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

पणजी: राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचारावर भर देण्याचे ठरवले आहे. यासाठी कोविडच्या संसर्गातून बरे झालेल्या हजारभर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे सरकारने विशेष लक्ष पुरवण्याचे ठरवले आहे. प्लाझ्मा दानाविषयी राज्यभरात जागृती करावी लागणार आहे. कोविड उपचार केंद्रात योग्य ते उपचार मिळतील आणि तेथे स्वच्छता राखली जाईल, किमान सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णवाहिका, खाटा किती भरल्या आहेत, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट याविषयी अहवालही त्यांनी मागवला आहे. तसेच कोविड संसर्गातून बरे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

कोविड उपचार व्यवस्थापनावर मुख्यमंत्र्यांनी आता बारकाईने लक्ष पुरवणे सुरू केले आहे. काल त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यभरातील कोविड व्यवस्थापनाचा आढावा घेतला. राज्याच्या सीमा खुल्या करतानाच समाज अंतर पाळणे, मुखावरण वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंद करता येणार नाही, असेही त्यांनी काल स्पष्ट केले होते. आज मुख्यमंत्र्यांनी कोविड निगा केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधून तेथील समस्या व प्रगती जाणून घेतली. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी आर. मेनका आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय हेही या बैठकीत सहभागी झाले होते.

जागृतीविषयी झाली चर्चा
राज्‍य सरकारच्या सेवेत असलेल्या हजाराहून अधिक जणांना आता कोविडमधून बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या खातेप्रमुखांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे. प्लाझ्मा दानासाठी त्यांनी पुढे यावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकार नेमके काय करणार? याविषयी स्पष्टता नसली, तरी प्लाझ्मादात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कोविड उपचार केंद्रातील रुग्णांची काही समस्या असली, तर ती त्या ठिकाणीच सोडवावी अशी सूचना केली. महामारीच्या काळात समाजाला आवश्यक असलेली सेवा हे अधिकारी देत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले. या बैठकीत संदीप गावडे (कळंगुट रेसिडेन्सी), लक्ष्मीकांत कुट्टीकर (साई गर्ल्स हॉस्टेल), प्रसाद वोविलकर (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम), शमा आरोंदेकर (पणजी रेसिडेन्सी) प्रविंजय पंडित (केशव सेवा साधना वाठादेव),  शंकर गावकर (एमपीटी इस्पितळ),  गौरव गावकर (मडगाव  व कोलवा रेसिडेन्सी), मारिओ कार्वाल्हो (फातोर्डा इनडोअर स्टेडियम). जान्हवी कालेकर (शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र), राजेश साखळकर (गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह व मांडवी वसतीगृह) आणि कौशिक देसाई (आयआयटी गोवा) हे अधिकारीही सहभागी झाले होते.

प्रक्रिया रक्तदानाप्रमाणेच...
कोविड संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा (रक्तद्रव) कोरोनाबाधित गंभीर रुग्णाला दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्‍यता असते, हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु, कोविड संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोविड रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. ही प्रक्रिया रक्तदान प्रक्रियेप्रमाणेच आहे. यासाठी प्लाझ्मा घेण्यासाठी अत्याधुनिक मशिनचा वापर करण्यात येतो. यामध्ये फक्त प्लाझ्मा घेतला जातो. बाकीचे रक्त प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून, ती तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली केली जाते. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असावी. प्लाझ्मा देणाऱ्या कोविडमुक्त व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात. जर ती वैद्यकीयदृष्ट्या पात्र असेल तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी दीड ते दोन तास लागतात. प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीस अजिबात अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही.

कोरोनाचे ५८८ सर्वाधिक रुग्‍ण
राज्यात मंगळवारी आजवरचे सर्वाधिक असे ५८८ कोविड रुग्ण सापडले. दोन जणांचा मृत्यू आज कोविडमुळे झाला. सरकारने पत्रकातून ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार आजवर राज्यात १८ हजार ६ कोविड रुग्ण सापडले असून त्यापैकी १३ हजार ८५० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू असून कोविडमुळे मृत्यू आलेल्यांचा आकडा १९४ वर पोहोचला आहे. आज ३ हजार ५०६ नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ३ हजार २७१ नमुन्यांचा तपासणी निकाल आज देण्यात आला. त्यातून २ हजार ६८३ नमुन्यांतून कोविडची लागण झाली नसल्याचे दिसून आले, तर ५८८  नमुन्यांतून कोविडची लागण झाल्याचे दिसून आले. ४९१ नमुन्यांचे निकाल येणे बाकी आहे. गोमेकॉतील अलगीकरण कक्षात ११५ जण असून संस्थात्मक अलगीकरणात २६ जण आहेत. आज मरण पावलेल्या दोन्ही व्यक्ती ७० वर्षीय आहेत त्यापैकी एक पेडण्यातील तर दुसरी व्यक्ती घोगळ मडगाव येथील आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या