बायंगिणी प्रकल्पाची दहा दिवसांत निविदा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

पणजी महापालिकेला सध्या कचरा प्रकल्पाची नितांत गरज आहे, त्याशिवाय महापालिकेच्या मालकीची ही जागा असून, त्या जागेवर अद्याप प्रकल्प उभारला नाही. त्यातच उच्च न्यायालयाने महापालिकेला कांपाल येथे टाकलेल्या कचऱ्यामुळे धारेवर धरले होते

पणजी: केवळ तिसवाडी तालुक्यासाठी नव्हेतर सत्तरी, फोंडा आणि डिचोली तालुक्यांसाठीही फायदेशीर ठरणाऱ्या बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मुहूर्त निघण्याच्या घटिका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाविषयीच्या निविदा दहा दिवसांत काढली जाईल, असे आश्‍वासन आज त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे. 

आज मंत्रालयात कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स आणि कचरा व्यवस्थापन महामंडळाचे लेविन्सन मार्टिन या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली आणि कचरा प्रकल्पाची गरज पुन्हा एकदा कथन केली. 

पणजी महापालिकेला सध्या कचरा प्रकल्पाची नितांत गरज आहे, त्याशिवाय महापालिकेच्या मालकीची ही जागा असून, त्या जागेवर अद्याप प्रकल्प उभारला नाही. त्यातच उच्च न्यायालयाने महापालिकेला कांपाल येथे टाकलेल्या कचऱ्यामुळे धारेवर धरले होते. यासर्वातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने आपल्या मालकीची असलेल्या बायंगिणी प्रकल्पाच्या जागेतील २५ हजार चौरस मीटर जागा शहरातील झाड व पालापाचोळा कचरा टाकण्यासाठी द्यावी, अशी मागणी कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे केली होती. परंतु महामंडळाने केवळ चार हजार चौ. मी. जागा महापालिकेला देऊ केली. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने महामंडळाला दिलेली सर्वच्या सर्व १ लाख ७१ हजार ३१२ चौ. मी. जागा परत घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. 

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची गरज ओळखून तत्काळ निर्णय घेतला. याबद्दल त्यांचे आभार. - उदय मडकईकर, महापौर

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या