उमेदवार रुपी एक तलवार, अन् तीन म्यॅन !

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्र्यांनी फक्त निवडणुकीपर्यंत नसून त्यानंतरही एकसंध राहून पक्षाचे कार्य पुढे नेण्याची गरज असल्याची जोड दिली.

काणकोण  : श्रीस्थळ पंचायत सभागृहात भाजप मंडळातर्फे आयोजित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्या सत्कार सोहळ्यात सूत्रसंचालक सूरज नाईक गावकर यांनी  भाजपचे काणकोणमधील तीनही नेते आज या व्यासपिठावर असल्याचे सांगितले. त्यामध्ये उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर व माजी आमदार विजय पै खोत यांचा त्यांनी उल्लेख केला. त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकसंध राहून काणकोणात भाजपचा आमदार निवडून आणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या तोंडावरील मुखावरण काढून फक्त निवडणुकीपर्यंत नसून त्यानंतरही एकसंध राहून पक्षाचे कार्य पुढे नेण्याची गरज असल्याची जोड दिली.

सत्तेच्या सारीपाटात भाजपने काणकोणात भाजपची तलवार बहाल केलेले तीन नेते निर्माण केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपचे माजी मंत्री रमेश तवडकर व माजी आमदार विजय पै खोत हे दोन नेते काणकोणात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मंत्री रमेश तवडकर यांना डावलून उमेदवारी पै खोत यांना दिल्याने स्वाभिमान दुखावल्‍याने तवडकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपच्या पारंपरिक मतदारामध्ये खिंडार पाडले. या पैंगीण मतदारसंघावर इजिदोर फर्नांडिस यांची पकड पूर्वीपासून होती. या दुफळीचा फायदा श्रीस्थळ,आगोंद व पालिका क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवून गेल्या विधानसभा निवडणुकीत इजिदोर फर्नांडिस हे विजयी ठरले. गेली अनेक वर्षे आमदार म्हणून निवडून येऊनही त्यांना सत्तेचा उपभोग घेता आला नाही. त्यासाठी संधी मिळताच केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांच्‍यासह दहा काँग्रेस आमदार गेल्या वर्षी १० जुलैला भाजपवासीय झाले.

आगामी निवडणुकीत खरी कसोटी
राजकीय कारकिर्दीत जे सौख्य मिळाले नाही, ते गेल्या दीड वर्षात भाजप सरकारात मिळाल्याचे उपसभापती व उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी जाहीररीत्या आज काणकोणात सांगितले. आता भाजपची  खरी कसोटी येत्या निवडणुकीत लागणार आहे. गेल्या महिन्यात माजी मंत्री रमेश तवडकर याचा रोष शांत करण्यासाठी सरकारने त्यांना आदिवासी कल्याण आयोगाचे अध्यक्षपद बहाल केल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी तवडकर व भाजप मंडळ यांच्यात कार्यक्रमांना रितसर आगावू निमंत्रण देण्यात येत नसल्याबद्धल वाकयुद्ध सुरू होते. त्याचप्रमाणे उपसभापती फर्नांडिस यांनी आताच उमेदवारी विषयी चर्चा न करता पहिल्यांदा पक्षाच्या कार्याला झोकून देण्याचा सल्ला दिला होता. यापूर्वीही फर्नांडिस यांनी भाजपात प्रवेश करून पक्ष सोडला होता. मात्र आता सर्व राजकीय कारकिर्द भाजपात राहूनच पूर्ण करणार, असे उपसभापती फर्नांडिस व उपमुख्यमंत्री कवळेकर जाहीररीत्या स्पष्ट केले आहे. उपसभापती फर्नांडिस यांनी यापूर्वीच आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप गत विधानसभा निवडणुकीचा इतिहासाची पुनरावृत्ती करणार की विद्यमान आमदाराला उमेदवारी देणार हे येणारा काळच ठरवणार आहे

संबंधित बातम्या